सातारा : जिल्ह्यात जानेवारीत बसणार स्मार्ट मीटर | पुढारी

सातारा : जिल्ह्यात जानेवारीत बसणार स्मार्ट मीटर

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  महावितरणकडून लवकरच स्मार्ट मीटर मिळणार आहेत. मोबाइल सीम कार्डप्रमाणे हे स्मार्ट मीटर पोस्टपेड आणि प्रीपेडमध्ये १ कोटी ६६ लाख ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. त्यामुळे ग्राहकांना जेवढा वीज वापर असेल तेवढे बिल अदा करावे लागणार आहे. याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून मुंबई, पुणे व अन्य मेट्रोसिटीत हे मीटर बसले आहेत. तर जिल्ह्यातही जानेवारी २०२३ पासून हे मीटर बसवण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात घरगुती ३ लाख ४३ हजार ६५७, वाणिज्य २१ हजार ५१०, औद्योगिक ३ हजार १८४५, पाणी योजना ३ हजार ३८ तर ५ हजार २७ पथदिवे असणारे ग्राहक आहेत. सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक मीटरचा सर्रास वापर केला जात आहे. यामध्ये अनेकदा चुकीचे बिल येणे, बिल वाढून येणे, मीटरचे रिडिंग व्यवस्थित नसणे, वारंवार मीटर खराब होणे अशा गोष्टी घडत आहे. यावर स्मार्ट मीटर हा चांगला पर्याय राहणार आहे. प्रीपेड मीटर अगदी मोबाईलच्या सीमकार्डसारखे काम करते. महिन्याला कॉलिंग किंवा डेटा वापरण्यासाठी आधी रिचार्ज करावा लागतो. त्यानंतर ठराविक दिवसांपर्यंत किंवा तुमच्या वापरानुसार रिचार्जसुरू राहते. तसेच वीज बिल प्रीपेड मीटरबाबत असणार आहे. या प्रीपेड वीज मीटरला आधी रिचार्ज करावे लागेल, त्यानुसार तुमच्या वापरानुसार पैशांची कपात होत राहणार आहे. याचे फायदे असले तरी त्याची व्यवस्था कशी राहणार? | अतिरिक्त चार्ज बंद होणार का? स्मार्ट मीटर बसवण्यास किती वेळ लागणार या गोष्टी अद्याप गुलदस्त्यात आहेत.

जेवढा वापर तेवढे बिल

मोबाईलसारखे स्मार्ट मीटर रिचार्ज करता येईल. मीटर पोस्टपेड आणि प्रीपेड स्वरूपात उपलब्ध असेल. महावितरणला मीटर रीडिंगसाठी कर्मचारी पाठवण्याची गरज उरणार नाही. वापरलेल्या विजेची डेटा हिस्ट्री एका क्लिकवर मिळणार. ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल, वीज चोरीस आळा बसेल. रिचार्ज संपल्यास मात्र बत्ती गुल होणार आहे.

Back to top button