साताऱ्यात अल्पवयातच बांधले जातेय बाशिंग; वर्षभरात रोखले १५ बालविवाह | पुढारी

साताऱ्यात अल्पवयातच बांधले जातेय बाशिंग; वर्षभरात रोखले १५ बालविवाह

सातारा; मीना शिंदे :  लहान वयातील विवाह रोखण्यासाठी शासनाने बालविवाह प्रतिबंध कायदा केला आहे. तरी देखील मागील वर्षभरात जिल्ह्यात सुमारे १५ बालविवाहाचा घाट घालण्यात आला होता. मात्र हे बालविवाह रोखण्यात यश आले. आजही अल्पवयात अनेक मुलींना बाशिंग बांधून बोहल्यावर चढवल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. सामाजिक जनजागृतीबरोबर कायद्याच्या कठोर अंमलबजावणीची गरज पुन्हा नव्याने समोर आली आहे.

वंशवेल वाढवून निसर्गचक्राचे सातत्य राखण्यात विवाह संस्थेचे महत्त्व असले तरी विवाहासाठी योग्य वयाचे निर्बंध पाळणेही तितकेच गरजेचे आहे. लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी शारीरिक व मानसिकरित्या परिपूर्ण असणेही तितकेच आवश्यक आहे. मात्र आता वयोमर्यादा वाढवून शासनाने मुला- मुलींचे लग्नाचे वय २१ वर्षे असे निर्धारित केले आहे. गत वर्षापर्यंत मुलींसाठी १८ व मुलांसाठी २१ अशी अट होती. सुरक्षीत मातृत्वासाठी व सुज्ञ पालकत्वासाठी ही वयोमर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यासाठी बालविवाह प्रतिबंध कायदा करण्यात आला आहे. २१ वर्षांखालील मुला-मुलींचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्यात नुकतीच सुधारणा करुन बालविवाह लावल्यास पालकांसह वऱ्हाड मंडळींवरही गुन्हे दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरी देखील शिक्षणाने समृध्द असलेल्या समाजव्यवस्थेमध्ये चोरी-छुपे आजही बालविवाह होत आहेत. जिल्ह्यात बालवयातच बाशिंग बांधून बोहल्यावर चढवण्याचा घाट घातल्याच्या तब्बल १५ घटना एका वर्षात समोर आल्या आहेत.

अशिक्षीत व अल्पसंख्याक समाजामध्ये आजही बालविवाहाचे प्रमाण कायम आहे. जिल्ह्यात २०२१ मध्ये ६ बालविवाह रोखण्यात आले असून चालू वर्षात आजअखेर १५ बालविवाह रोखत जिल्हा पोलिस व जिल्हा महिला व बाल विकास विभाग कार्यालयाने कारवाई केली आहे.

बालविवाहाचे दीर्घकालीन परिणाम

अज्ञान, आर्थिक व सामाजिक समस्या, चांगल्या स्थळाचा हव्यास, प्रेम प्रकरण आदि बालविवाहाची अनेक कारणे आहेत. बालविवाह लावणे हा कायद्याने गुन्हा आहेच परंतू कमी वयात लग्न झाल्याने अनेक दीर्घकालीन दुष्परिणाम जाणवतात. कमी वयातील विवाहाने मातृत्वासह विविध जबाबदाऱ्या लहान वयातच वाढत असून सामाजिक, मानसिक विकास परिपूर्ण न होणे, अशा दीर्घकालीन परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही समाजातील काही वर्ग लपून छपून अल्पवयीन मुलांचे विवाह करतात. बालविवाह घडवून आणणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. दोन्ही कुटुंब व सहभागी होणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. बालविवाहाची माहिती मिळताच त्याबाबत चाईल्ड हेल्पलाईन व संबंधित प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा.
– विजय तावरे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी.

Back to top button