सातारा : टोल देणार नाही अन् पासही घेणार नाही; स्थानिकांचा एल्गार | पुढारी

सातारा : टोल देणार नाही अन् पासही घेणार नाही; स्थानिकांचा एल्गार

तासवडे टोलनाका; पुढारी वृत्तसेवा : पुणे- बेगलोर महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर स्थानिकांना टोल व मासिक पास सक्तीचा केला होता. त्या विरोधात परिसरातील वहागाव, तळबीड, खोडशी, वनवासवाची, घोणशी, बेलवडे हवेली, तासवडे, शिरवडे, शहापूर, वराडे, शिवडे, नडशी, हनुमाननगर, यशवंतनगर भवानवाडी, उंब्रज या गावातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व वाहनधारकांनी एकत्र येत टोल प्रशासनास निवेदन देत जोरदार निदर्शने केले. यावेळी टोल देणार नाही आणि पासही घेणार नाही, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडत टोल नाक्याविरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे.

महामार्गावरील तासवडे टोलनाका काही महिन्यांपूर्वीच एका खासगी कंपनीकडे हस्तांतरित झाला आहे. त्या खासगी कंपनीकडून स्थानिकांसाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये २० की. मी. परिसरातील स्थानिक वाहनधारकांना मासिक पास सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच जर पास नसेल तर टोल नाक्यावरून वाहन सोडले जात नव्हते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून मासिक पास नसल्यामुळे स्थानिक वाहनधारक व टोल कर्मचारी यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग घडले.

टोलचे पैसे घेण्यावरून अक्षरशः मारामारीचे प्रसंग घडले. त्यामुळे टोलनाक्याच्या विरोधात स्थानिकांमध्ये असंतोष खदखद होता. २००४ ला पुणे-बेंगलोर महामार्गाचे चौपदरीकरण झाले.त्यावेळी स्थानिक वाहगाव, तळबीड, खोडशी, वनवासमाची, घोणशी, बेलवडे हवेली, तासवडे,वराडे, शिरवडे, शहापूर, नडशी, हनुमाननगर, यशवंत नगर, भवानवाडी उंब्रज या गावातील वाहनधारकांकडून टोल घेतला जात नव्हता. तसेच स्थानिक गावातील लोकांना शिक्षण, नोकरी, शासकीय कामे, लग्न सोहळे, शेतातील माल व विविध कार्यक्रमा निमित्त टोलनाक्यावरून दररोज प्रवास करावा लागतो. दरम्यान मासिक पास सक्तीमुळे स्थानिक वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार होता.

या विरोधात मंगळवारी माणिकराव पाटील, तुषार पवार, प्रणव ताटे, संग्राम पवार, सचिन पवार, संजय पिसाळ, दीपक पिसाळ, उमेश मोहिते, जयवंत मोहिते, दुर्गेश मोहिते, अमित जाधव, शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव, संतोष चव्हाण, दत्ता पाटील, श्रीकांत पवार, दाजी पवार, संग्राम पवार, यांच्यासह सर्वपक्षीय नेते, सरपंच व वाहनधारकांनी एकत्र येत टोलनाक्यावर निवेदन देत जोरदार निदर्शने केली. यावेळी स्थानिकांनी आम्ही टोल देणार नाही आणि पासही घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.

Back to top button