सातारा : घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीचे उतारे | पुढारी

सातारा : घरबसल्या मोबाईलवर ग्रामपंचायतीचे उतारे

सातारा; प्रवीण शिंगटे : नागरिकांना आता ग्रामपंचायतींचे विविध दाखले व उतारे घरबसल्या मिळू लागले आहेत. ऑनलाईन पध्दतीने हा लाभ घेता येत असून त्यासाठी शासनाने महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट अ‍ॅप विकसित केले आहे. यावरून ग्रामीण भागातील नागरिकांना आता ग्रामपंचायत कार्यालयात न जाता विविध सेवांसाठी घरबसल्या अर्ज करता येत आहे. जिल्ह्यातील 1 हजार 494 ग्रामपंचायतींमधील 22 हजार 673 नागरिकांनी महा ई ग्राम अ‍ॅपवर नोंदणी केली आहे.

पहा काय मिळणार…

मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना घरबसल्या गावठाणातील जागेचा उतारा, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्र्य  रेषेखालील प्रमाणपत्र, असेसमेंट उतारा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र यासारखे अनेक प्रकारचे दाखले मिळणार आहेत.

घरबसल्या कसे मिळवाल दाखले

मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून महा ई ग्राम अ‍ॅप सिटिझन कनेक्ट हे अ‍ॅप इन्स्टॉल करावयाचा आहे. अ‍ॅप ओपन करून रजिस्टर करा. त्यामध्ये आपले नाव, लिंग, जन्मतारीख, मोबईल नंबर, ई मेल आयडी यासह सर्व माहिती जतन केल्यानंतर मिळालेल्या युजर पासवर्डद्वारे लॉगिन करावयाचे आहे.

मालमत्तांचीही झाली नोंद

नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये हेलपाटे मारावे लागतात. प्रत्येक वेळी नागरिकांना दाखला वेळेत मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे राज्याच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या अनेक सुविधा देण्यासाठी महा ई ग्राम अ‍ॅप सुरू केले आहे. तसेच गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत मालमत्तांची नोंदही झाली आहे.

अ‍ॅपवर कर भरलेल्या नागरिकांची संख्या…

जावली 5, कराड 9, खंडाळा 7, खटाव 2, कोरेगाव 48, महाबळेश्वर 7, माण 45, पाटण 20, फलटण 8, सातारा 13, वाई 24 असे मिळून 188 नागरिकांनी महा ई ग्राम अ‍ॅपवर व्यवहार केले आहेत.

349 जणांनी काढले विविध दाखले

जावली 5, कराड 15, खंडाळा 11, खटाव 9, कोरेगाव80, महाबळेश्वर 10, माण 92, पाटण 38, फलटण 16, सातारा 22, वाई 51 असे मिळून 349 दाखले महा ई ग्राम अ‍ॅपवरून नागरिकांनी काढले आहेत.

नागरिकांनी महा ई ग्राम अ‍ॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व सदस्यांनी याचा प्रसार करून गावातील ग्रामस्थांना या अ‍ॅपसंदर्भात माहिती द्यावी. त्यामुळे घरबसल्या विविध प्रकारचे दाखले नागरिकांना मिळणार आहेत.
– अर्चना वाघमळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

Back to top button