सातारा : जेलमधील संशयिताच्या व्हिडीओने खळबळ | पुढारी

सातारा : जेलमधील संशयिताच्या व्हिडीओने खळबळ

सातारा : ऐन नवरात्र सणावेळी पोवई नाका येथे राडा करून मंगळवार पेठेत रात्री बेछूट गोळीबार करणार्‍या ‘एएम’ या टोळीवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोका) कारवाई केल्यानंतरही त्यांचा धुडगूस सुरूच आहे. कारागृहात (जेल) फोनवर बोलत असतानाचा एका संशयिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने सातार्‍यात खळबळ उडाली असून गुन्हेगारांवर धाक नसल्याचे समोर आले आहे.

पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी जगतातील साफसफाईला सुरुवात करत धडाका सुरु केला. एएम या टोळीला पहिला मोक्का त्यांनी 16 नोव्हेंबर रोजी लावला. या टोळीतील अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. यंदाच्या नवरात्री सणाला टोळीतील संशयितांनी फायरिंग करत मंगळवार पेठ हादरवून सोडली होती. टोळीला मोक्का लावल्यानंतर संशयितांना अटक करण्यात आली. सुरुवातीला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी तसेच तपासासाठी पुन्हा शाहूपुरी पोलिसांकडे ताबा अशी प्रक्रिया सध्या सुरु आहे.

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही टोळी सातारा न्यायालय परिसरात आणली गेल्यानंतर त्यांचा काही पंटरांनी व्हिडीओ बनवला आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. ही घटना ताजी असतानाच याच टोळीतील एकाचा थेट जेलमधील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. संशयित कारागृहात फोनवर बोलत असून मोबाईल कॅमेर्‍यामधून ते शूट केले गेले आहे. याला गाण्याची जोड देवून तो व्हिडीओ व्हायरल केला जात आहे.

संशयित गुन्हेगारांचे असे व्हिडीओ व्हायरल होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. आमचे कोणी काही करु शकत नाही, असा संदेश एकप्रकारे टोळीकडून दिला जात आहे. संबंधित टोळीला कोण मुभा देत आहे? यंत्रणा मॅनेज केल्या जात आहेत का? यामध्ये कोणाचा सहभाग आहे? असे सवाल उपस्थित झाले आहेत. यासाठी पोलिसांनी अलर्ट राहण्याची गरज आहे.

व्हिडीओ कुठल्या जेलमधील..?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत सातारा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? याबाबत लगेच सांगता येणार नाही. सातारा की अन्य कारागृह? व्हिडीओ आताचा की पूर्वीचा? याबाबतची माहिती घेतली जाईल.

Back to top button