राष्ट्रीय ग्राहकदिन विशेष : गॅस घेताय… सावधानता बाळगा; सेफ्टी ऑडिट आवश्यक | पुढारी

राष्ट्रीय ग्राहकदिन विशेष : गॅस घेताय... सावधानता बाळगा; सेफ्टी ऑडिट आवश्यक

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात एलपीजी ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एलपीजी गॅस दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने केलेल्या सुचनांचे पालन ग्राहकांनी करावे. गॅस सिलिंडर, शेगडी, रेग्युलेटर, सुरक्षा ट्यूब यांची नियमित तपासणी करावी. सेफ्टी ऑडिट महत्वाचे आहे. एलपीजी गॅस ग्राहकांनी नेहमी सजग व सावध राहणे आवश्यक आहे.

अधिकृत वितरकांकडूनच सिलिंडरची डिलिव्हरी पूर्व तपासणी केली जाते. ग्राहकांनी वितरकांकडून सीलबंदच सिलिंडर घेणे आवश्यक आहे. सिलिंडर डिलिव्हरी बॉयकडून सेफ्टी किटद्वारे सिलेंडरचे वजन आणि व्हॉल्ह/ओरिंगची गळती तपासून पाहिल्यास धोका टळतो. मुद्रित कॅश मेमो केवळ मिस्ड कॉलद्वारे किंवा ऑनलाईन बुकिंग पध्दतीने ग्राहकाने केलेल्या आगाऊ बुकिंगसाठी उपलब्ध असतो. त्यामुळे डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांनी कॅश मेमो घेवून त्यावर सही करणे आवश्यक आहे. सुरक्षेच्यादृष्टीने काही बाबी महत्वाच्या आहेत. रात्री झोपताना रेग्युलेटर बंद करावा. एलपीजी सुरक्षा ट्यूब दर 5 वर्षांनी अधिकृत वितरकाकडून बदलणे आवश्यक आहे. गॅस कनेक्शनचा सुरक्षित वापर सुनिश्चित कारणासाठी अनिवार्य तपासणी आणि हॉटप्लेटची (शेगडी) सर्व्हिसिंग दर 5 वर्षांतून एकदा करणे आवश्यक आहे. शेगडी जमिनीवर न ठेवता ती नेहमी प्लॅटफॉर्म वर म्हणजे सिलिंडर टाकीपासून उंचावर असावी.

काही वेळा गॅस गळती होण्याची शक्यता असते. अशावेळी तात्काळ रेग्युलेटर बंद करुन गळती सुरु राहिल्यास रेग्युलेटर काढून व्हॉल्व्हच्या वर सेफ्टी कॅप ठेवून दाबून बसवणे आवश्यक आहे. गॅस गळतीची तक्रार नोंदवण्यासाठी ऑल इंडिया टोल फ्री क्रमांक 1906 वर किंवा गॅस गळतीसाठी संबंधित कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा अधिकृत वितरकांशी संपर्क साधता येईल.

गॅस गळतीवेळी कोणतेही विद्युत स्वीच सुरु किंवा बंद करु नयेत. गॅस गळती झाल्यास खिडक्या आणि दरवाजे उघडल्यास वायू घराबाहेर जाईल. त्यामुळे त्याची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. एलपीजी गॅसचा वास कुजलेल्या अंड्यासारखा येतो. त्यामुळे गॅस गळती सहज ओळखता येईल. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी संबंधित कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येईल. एलपीजी गॅस कंपन्यांनी ग्राहकांना डिजिटल बुकिंग आणि रिफिल डिलिव्हरीसाठी आगाऊ पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

ग्राहकांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी सजग राहिले पाहिजे. गॅस सिलिंडर संदर्भात ग्राहकांनी सुचनांचे पालन करावे. सतर्क व सुरक्षित रहावे. ग्राहक म्हणून आपल्या हक्कांप्रती जागृत रहावे. काही अडचण आल्यास नजिकच्या यंत्रणेशी संपर्क साधावा.
-स्नेहा किसवे-देवकाते, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा

Back to top button