Gram Panchayat Election Result : मुख्यमंत्री गटाचा सातारा जिल्ह्यात करिष्मा; भाजपची मुसंडी | पुढारी

Gram Panchayat Election Result : मुख्यमंत्री गटाचा सातारा जिल्ह्यात करिष्मा; भाजपची मुसंडी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात झालेल्या 319 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालात आम्हीच नं. 1 असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपकडून केला जाऊ लागला आहे. निवडणुकीचे निकाल पाहिले तर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील वर्चस्वाला भाजपने सुरुंग लावत ग्रामपंचायतींमध्ये जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे. याशिवाय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या गटानेही अनेक ग्रामपंचायतींमध्ये करिष्मा दाखवत काँग्रेसला कोसो दूर मागे टाकले आहे. निवडणूक निकालानंतर जिल्ह्यात विजयी उमेदवारांच्या जल्लोषी मिरवणुका निघाल्या. (Gram Panchayat Election Result)

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चुरशीने 80.14 टक्के मतदान झाले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी ही ग्रामपंचायत निवडणूक लिटमस टेस्ट होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेनेचे दोन्ही गट सक्रियपणे या निवडणुकीत उतरले होते. सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे मतदानाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी वादावादी झाली. मोठ्या ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष उफाळून आला. (Gram Panchayat Election Result)

जिल्ह्यात 319 ग्रामपंचायतींसाठी तालुक्याच्या ठिकाणी मंगळवारी मतमोजणी झाली. निकाल जाणून घेण्यासाठी तालुक्यातून हजारो नागरिकांनी मतमोजणी केंद्रावर गर्दी केली होती. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेस प्रारंभ झाला. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे निकाल दुपारी 12.30 वाजेपर्यंत जाहीर झाले. (Gram Panchayat Election Result)

सातारा तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 19 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. या ग्रामपंचायतींपैकी काही ग्रामपंचायतींवर खा. उदयनराजे भोसले गटानेही दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 4 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. 9 ग्रामपंचायतींमध्ये आ. महेश शिंदे गटाचा करिष्मा दिसून आला. 7 ग्रामपंचायतींवर इतर पक्ष, आघाड्यांनी कब्जा जमवला. (Gram Panchayat Election Result)

वाई तालुक्यात 7 ग्रामपंचायतींमध्ये जोरदार लढती झाल्या. आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 3 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. 4 ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनेल, आघाड्यांचे प्राबल्य राहिले.

महाबळेश्वर तालुक्यातील 6 ग्रामपंचायती चुरस झाली. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 3 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले.

जावली तालुक्यात 15 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यामध्ये आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 14 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. एक ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहिली.

खंडाळा तालुक्यात 2 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत काँटे की टक्कर अशा लढती अनुभवयाला मिळाल्या. शिरवळमध्ये राष्ट्रवादीने भाजपचा पराभव करून सत्तांतर घडवले तर असवलीत जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ यांनी बंडू ढमाळ यांच्या पॅनलचा पराभव करून सत्तांतर घडवले.

खटाव तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींमध्ये चुरशीने मतदान झाले. या तालुक्यात माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. सुरेंद्र गुदगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मायणी ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले आहे. 3 ग्रामपंचायतींवर आ. महेश शिंदे गटाने वर्चस्व मिळवले. 5 ग्रामपंचायती स्थानिक आघाड्या, पॅनेलच्या ताब्यात राहिल्या.

कोरेगाव तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींमध्ये जोरदार लढती झाल्या. या तालुक्यात आ. महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 19 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 30 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये फलटण विधानसभा मतदार संघातील कोरेगाव उत्तर भागातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 20 ग्रामपंचायती ताब्यात घेत दणदणीत विजय मिळवला. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 5 ग्रामपंचायतींवर दावा केला आहे. इतर 2 ग्रामपंचायतींवर स्थानिक आघाड्या, पॅनेलचे प्राबल्य राहिले.

माण तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 16 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राहिले. शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने (ठाकरे गट) 2 ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. महाविकास आघाडीने 3 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. तर इतर एका ग्रामपंचायतींवर पक्षांनी संमिश्र सत्ता मिळवली.

कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींमध्ये जोरदार लढती झाल्या. या निवडणुकीत माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण व जि. प. सदस्य उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 10 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपला 4 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले. 8 ग्रामपंचायतींमध्ये पक्षांची संमिश्र सत्ता राहिली. कराड उत्तर विधानसभा मतदार संघात 24 ग्रामपंचायती मिळवल्याचा दावा भाजपचे मनोजदादा घोरपडे यांनी केला आहे.

पाटण तालुक्यात सर्वाधिक 86 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले. राज्य उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये वर्चस्व मिळवले. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने काही ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. महाविकास आघाडीला 1 तर शिवसेनेला (उध्दव ठाकरे) 2 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले.

भाजप जिल्ह्यातला नं. 1 पक्ष

सातारा जिल्ह्यात झालेल्या 319 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सर्वाधिक 98 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावून भाजप सातारा जिल्ह्यातील नं. 1 पक्ष ठरला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी, आमदार, खासदार व पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या मेहनतीचे हे फार मोठे यश आहे. विरोधक खोटे आकडे दाखवून अजूनही स्वत:चे ढोल वाजवत आgram panchayat election result : मुख्यमंत्री गटाचा सातारा जिल्ह्यात करिष्मा; भाजपची मुसंडीहेत. त्यांच्या कथित बालेकिल्ल्याला आम्ही सुरुंग लावला असून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फार मोठे यश आहे.
– आ. जयकुमार गोरे, भाजप जिल्हाध्यक्ष

युतीकडून 198 चा तर राष्ट्रवादीकडून 138 चा दावा

ग्रामपंचायत निवडणुकीत युतीने 199 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. त्यात भाजपला 98, भाजप व शिंदे गटाला 32, फक्त शिंदे गटाला 69 ग्रामपंचायती मिळाल्याचे म्हटले आहे. भाजप व शिंदे गट मिळून युतीला 199 जागा मिळाल्याचा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार राष्ट्रवादीला 76, काँग्रेसला 7, ठाकरे गटाला 9 तर इतरांना 27 ग्रामपंचायती मिळाल्याचे म्हटले आहे. दरम्यान,राष्ट्रवादीने जिल्ह्यात सर्वाधिक 138 ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे तर त्यांच्या दाव्यानुसार काँग्रेस 13, भाजप 55, ठाकरे गट 5, शिंदे गट 87 व अन्य 19 असे बलाबल दाखवण्यात आले आहे.

Back to top button