सातारा : महाराष्ट्र केसरीचा वाद बरोबरीत; थरार जानेवारीत | पुढारी

सातारा : महाराष्ट्र केसरीचा वाद बरोबरीत; थरार जानेवारीत

सातारा; विशाल गुजर :  महाराष्ट्राच्या कुस्ती विश्वातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आयोजन वाद बरोबरीत सुटला आहे. ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होण्यावर शिक्कामोर्तब झाले असून २०२२ ची महाराष्ट्र केसरीचा थरार जानेवारी २०१३ मध्ये रंगणार असून सातारा जिल्ह्यातील पैलवान सज्ज होवू लागले आहेत. त्याचबरोबर २०२३ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगर येथे घेण्याचेही पुण्यात झालेल्या बैठकीत ठरले आहे.

६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनावरून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि भारतीय कुस्ती महासंघ यांच्यात वाद उफाळला होता. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेला ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही स्पर्धा भरवण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने मैदानांची पाहणी केली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत अहमदनगरच्या आ. संग्राम जगताप प्रतिष्ठान ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद दिले. त्यातच अस्थायी समितीने पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना देण्याचे ठरवले. यावरून वाद सुरु होते. त्यामुळे महाराष्ट्र केसरी पुण्यात आणि अहमदनगर येथे घेण्याबाबत दोन्ही आयोजकांनी भूमिका व्यक्त केली होती. त्यामुळे कोणत्या स्पर्धेत सहभागी व्हायचे याबाबत मल्लांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण सिंह आणि राष्ट्रवादीचे खा. शरद पवार यांच्यात दिल्ली येथे बैठक झाली.

कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाची अधिकृत जबाबदारी संस्कृती प्रतिष्ठानला देण्याबाबत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खा. बृजभूषण सिंह यांच्याकडून संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना पत्र देण्यात आले होते. त्यानंतरही नगर येथे स्पर्धा घेण्यावर तेथील आयोजकांनी भूमिका स्पष्ट केली होती. या संभ्रमावस्थेमुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत पुण्यात बैठक घेतली. या बैठकीत स्पर्धा आयोजनाबाबत चर्चा झाली. त्यामध्ये २०२२ ची ६५ वी • महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात घ्यायचे ठरले. तर कोरोनामुळे न झालेली ६३ वी महाराष्ट्र केसरी ही २०२३ मध्ये अहमदनगर येथे घेण्याबाबत शिक्कामोर्तब झाला आहे. दि. ११ ते १५ जानेवारी २०२३ या कालावधीत पुण्यातही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे.

दोन्ही संघटनांमधील वाद मिटला

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व भारतीय कुस्ती महासंघ या दोन्ही संघटनांचा वाद अखेर पुण्यात झालेल्या बैठकीत मिटला आहे. खा. शरद पवार व खा. ब्रिजभूषण सिंह यांच्यात मनोमिलन झाल्याने महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजनाचा वाद संपुष्टात आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे होणार हे ठरले असल्याने कुस्तीशौकीन व पैलवानांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर पैलवानांनी सर्व करण्यावर भर दिला आहे.

Back to top button