सातारा : जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींची मतमोजणी; दोन तासांत निकाल | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील 259 ग्रामपंचायतींची मतमोजणी; दोन तासांत निकाल

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात चुरशीने मतदान झालेल्या 259 ग्रामपंचायतींसाठी मंगळवार दि. 20 रोजी मतमोजणी होणार आहे. ग्रामपंचायत संख्या, वॉर्ड व मतदान केंद्र यावर मतमोजणी फेर्‍या अवलंबून आहेत. मतमोजणी सुरू झाल्यानंतर दोन-तीन तासांत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. मतमोजणी त्या त्या तालुक्यांच्या ठिकाणी होणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. विजयाचा गुलाल कुणाचा याची उत्सुकता लागली आहे.

जिल्ह्यात जाहीर झालेल्या 259 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच आणि सदस्यपदासाठी रणांगणात उतरलेल्या सुमारे 4 हजार 542 उमेदवारांचे नशीब मतदान यंत्रात रविवारी बंद झाले. 4 लाख 43 हजार 319 मतदारांपैकी 3 लाख 55 हजार 254 मतदारांनी हक्क बजावला. जिल्ह्यात 926 मतदान केंद्रांवर 80.14 टक्के मतदान झाले. संबंधित तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रावर सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सातारा तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने 79.94 टक्के, कराड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींसाठी 83.32 टक्के, पाटण तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी 78.69 टक्के, कोरेगाव तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींसाठी 81.45 टक्के, वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी 79.88 टक्के, माण तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींसाठी 78.79 टक्के, खंडाळा तालुक्यात 2 ग्रामपंचायतींसाठी 76.70 टक्के, महाबळेश्वर तालुक्यात 3 ग्रामपंचायतींसाठी 71.10 टक्के, जावली तालुक्यात 11 ग्रामपंचायतींसाठी 78.59 टक्के, फलटण तालुक्यातील 20 ग्रामपंचायतींसाठी 82.07 टक्के, माण तालुक्यात 28 ग्रामपंचायतींसाठी 78.69 टक्के, खटाव तालुक्यात 12 ग्रामपंचायतींसाठी 76.43 टक्के मतदान झाले. आता मंगळवारी होणार्‍या निकालाकडे जिल्हावासियांच्या नजरा लागल्या आहेत. काही ग्रामपंचायतींचे निकाल तासादोन तासात जाहीर होतील, अशी शक्यता आहे. वादाचे प्रसंग उद्भवू नयेत आणि ग्रामपंचायत निवडणूक निकाल लवकर जाहीर व्हावेत, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

मतदानानंतर ग्रामीण भागात निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. कुठे कोण कमी पडला, कुठे दगाफटका झाला यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. सोमवारी दिवसभर या एक्झिट पोलवरच चर्चा रंगल्या होत्या. तालुक्यांमध्ये निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींची संख्या कमी-जास्त आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

Back to top button