

सातारा : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीमध्ये (एमएसईबी) ज्युनिअर सिक्युरिटी ऑफिसरपदी नोकरी लावतो, असे सांगून वेळोवेळी पैसे घेऊन तब्बल ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता, ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, याप्रकरणातील तक्रारदार हे कारंडवाडी (ता. सातारा) येथील आहेत. तुषार विजय साळुंखे (वय ३५, रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांनी पार्थ केशव राऊत (वय ३५, रा. जुनी सांगवी, पुणे) व राजेंद्र दत्तात्रय होळकर (रा. खडकी, पुणे) या दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना २०१९ ते २०२४ या कालावधीत घडली आहे. तक्रारदार हे साताऱ्यात राहत असून, त्यांचे वडील व भाऊ हे मुंबईला वास्तव्य करत आहेत. तक्रारदार यांचा भाऊ जयवंत यास एमएसईबीमध्ये लावतो, असे सांगून तक्रारदार यांचे वडील विजय साळुंखे यांनी २३ लाख रुपये संशयितांना दिले.
त्याचदरम्यान, तक्रारदार यांच्या वडिलांची तब्येत बिघडली. यामुळे तक्रारदार हे वडिलांना मुंबईत पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांना भावाला नोकरीला लावतो सांगून पैसे घेतले असल्याबाबतची माहिती मिळाली. यानंतर तक्रारदार हे संशयित दोघांना भेटले. यावर दोघा संशयितांनी उर्वरित आणखी पैसे द्या, तुमचे काम होईल, पैसे दिले नाही तर आतापर्यंत दिलेले सर्व पैसे बुडतील, अशी भीती दाखवली. एमएसईबीमध्ये नोकरी लागण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी लवकर पैसे द्या, असे सांगून संशयितांनी पुन्हा पैसे घेण्यास सुरुवात केली. वेळोवेळी तक्रारदार यांच्याकडून पैसे संशयितांनी घेतले. मात्र, कोणतीही नोकरी लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी पैशांची मागणी केली असता, संशयित दोघांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तक्रारदार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने संशयित दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दोघांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. ही कारवाई पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्याम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, इरफान मुलाणी, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सागर गायकवाड, सचिन रिटे, विशाल धुमाळ, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केली.