पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदावर नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून २० लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी पांगरा (ता. पूर्णा) येथील सुदर्शन किशनराव ढोणे यांने एम. आर. ए. मार्ग मुंबई शहर पोलीस ठाण्यात १३ ऑगस्टरोजी तक्रार दिली आहे. (Parbhani Fraud Case)
या प्रकरणी निलेश पोबरेकर राठी, शिवाजी तांबे, प्रदिप पाटील, फिदा सलमानी, आसमा खान, सुमित्रा मुखर्जी, रमेश कोलथे, विश्वनाथ मोरे, रवि डुलगज, रामचंद्र कांबळे, वंदना खंडागळे, विकास थोरवे, नितीन जगताप, मंगेश साबळे (सर्व रा. मुंबई) यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parbhani Fraud Case)
याबाबत अधिक माहिती अशी की, पांगरा येथील सुदर्शन ढोणे याच्या पत्नीवर मुंबई येथील केईएम रुग्णालयात ऑक्टोबर २०२१ मध्ये उपचार सुरू होते. यावेळी तेथे सुदर्शन याची निलेश पोबरेकर राठी (मूळ रा. रत्नागिरी, सध्या रा. कामोठे, नवी मुंबई) याच्याशी ओळख झाली. निलेश यांने आपण परेल येथे मध्य रेल्वेमध्ये नोकरीला असल्याचे सांगितले. तसेच आपली पोस्ट ऑफिसर आणि रेल्वेचे अधिकारी ओळखीचे असल्याचे सुदर्शनला सांगून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. (Parbhani Fraud Case)
त्यासाठी निलेश पोबरेकर यांनी शिवाजी तांबे यांचा मोबाईल क्रमांक सुदर्शनला देऊन त्याची भेट घेण्यास सांगितले. तांबे याने सुदर्शनला जीपीओ पोस्ट ऑफिस येथे भेटण्यासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर तांबे यांने आपण जीपीओ पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टल असिस्टंट पदावर काम करत असल्याचे सांगितले. तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर या पदासाठी जाहिरात निघाल्याचे सांगितले. या पदावर नोकरी करावयाची असल्यास २० लाख द्य़ावे लागतील, असे सांगितले. तांबे याच्या विश्वास ठेवून सुदर्शनने पैसे देण्याचे मान्य केले. त्यानंतर तांबे याने दिलेल्या ४ वेगवेगळ्या खात्यावर सुमारे १९ लाख ६७ हजार ५२२ रुपये फोन पेवर पाठवून दिले. हे पैसे दि. ६ नोव्हेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२३ या कालावाधी देण्यात आले.
दरम्यान, पैसे देऊन ही नोकरी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्य़ाचे लक्षात येताच सुदर्शन याने तक्रार दिली. पुढील तपास एम. आर. ए. मार्ग बृहन मुंबई शहर पोलिस करत आहेत.