सातारा : सातारा विभागाला मिळणार १० नवीन बसेस | पुढारी

सातारा : सातारा विभागाला मिळणार १० नवीन बसेस

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुमारे १० नवीन बसेस मिळणार आहेत. या नवीन बसेस सातारा – स्वारगेट मार्गावर धावण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागात सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्वर, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा असे ११ आगार आहेत. मात्र, बहुतांश बसेस कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे या बसेस कोठेही बंद पडत आहेत. त्यामुळे त्याचा उत्पन्नावर परिणाम होत आहे. तरीही कर्मचारी नादुरुस्त बसेस त्वरित दुरुस्त करून त्या पुन्हा मार्गावर पाठवल्या जात आहेत. सर्वच आगारात बसेसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी नवीन बसेसची आवश्यकता आहे.

महामंडळाच्या सातारा विभागामार्फत सुमारे ८० बसेसचा प्रस्ताव मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. जास्तीत जास्त गाड्या
मिळाव्यात यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार पाठपुरावाही केला जात आहे. येत्या डिसेंबरपर्यंत सातारा विभागाला सुमारे १० नवीन बसेस मिळणार सातारा आहेत. या बसेस सातारा स्वारगेट मार्गावर सोडण्याचे नियोजन असले तरी विभाग नवीन बसेसच्या प्रतिक्षेत आहे.

स्वारगेट मार्गावरील जुन्या बसेस अन्य आगारांना देण्यात येणार आहेत. प्रवाशांचा ओढा एसटीकडे वाढला असला तरी बसेस अभावी फेऱ्या कमी होताना दिसत आहेत. सध्या शैक्षणिक सहलीसाठीही विविध शाळा, महाविद्यालये, विद्यालयांकडू बसेसला मागणी वाढली आहे. त्यानुसार त्या-त्या आगारामार्फत बसेस दिल्या जात असल्याचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी सांगितले.

Back to top button