सातारा; पुढारी वृत्तसेवा : मतकर कॉलनी, सातारा येथे घरगुती वादाच्या कारणातून संतप्त झालेल्या पतीने मुलीदेखतच पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून गंभीर जखमी केले. पहाटे झालेल्या घटनेनंतर जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी दाखल केले असता उपचारवेळी मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाने वडिलांविरुद्ध खुनाची तक्रार दिली आहे.
सौ. रंजना दिलीप पवार (वय ६०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप वामन पवार (वय ६२) या संशयित आरोपी विरुद्ध मुलगा प्रदीप दिलीप पवार (२४, सर्व रा. मतकर कॉलनी) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे..
याबाबत अधिक माहिती अशी, पवार कुटुंबीय एकत्रित राहत आहे. दि. ७ रोजी रात्री दिलीप पवार व रंजना पवार या दाम्पत्यामध्ये वादावादी झाली. पती दारु पित असल्याने त्यावरुन हा वाद झाला होता. रात्री कुटुंबातील सर्वांनी जेवण केल्यानंतर सर्वजण झोपी गेले. पहाटे ४ वाजता दिलीप पवार पुन्हा रंजना पवार यांच्या सोबत वाद घातला. यावेळी तक्रारदार मुलगा प्रदीप व मुलगी रुपाली यांनी दोघांना शांत केले. पहाटे ५ वाजता पुन्हा दिलीप पवार याने रंजना पवार यांच्यासोबत वाद घातला. हा वाद एवढा विकोपाला गेला की दिलीप पवार याने दगडी पाटा मारहाण करुन पत्नीला गंभीर जखमी केले. भांडण व किंचाळण्याच्या आवाजाने सर्वजण जागे झाले असता दिलीप पवार हा पत्नीला मारहाण करत असल्याने त्याला सर्वांनी बाजूला केले. मुलगी रुपाली हिच्या देखत ही घटना घडल्याने ती घाबरुन गेली. रंजना पवार या गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी तात्काळ सिव्हील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यावस्थ असल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना रंजना पवार यांचा मृत्यू झाला.
मतकर कॉलनी येथे पहाटे झालेल्या भांडणाची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक तपास करुन संशयित आरोपी दिलीप पवार याला ताब्यात घेतले. दरम्यान, रंजना पवार यांचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.