सातारा : पुष्पसौंदर्य वाढविण्यासाठी वनविभाग ‘अलर्ट मोड’वर | पुढारी

सातारा : पुष्पसौंदर्य वाढविण्यासाठी वनविभाग ‘अलर्ट मोड’वर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : जागतिक हेरिटेज असलेल्या सातारा येथील कास पठारावर गेल्या दोन-तीन वर्षांत फुलांचा बहर येण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. पठार परिसरात मानवी हस्तक्षेप वाढल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. कुंपणामुळे जनावरांना पठार परिसरात बंदी घातल्याने कासचा हेरिटेज दर्जाच आता धोक्यात आला आहे. कासची ही शान वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वन विभाग आक्रमक झाला आहे.

पर्यटकांची संख्या नियंत्रणात आणणे

 गेल्या काही वर्षांत कास पठारावर पर्यटकांची संख्या भरमसाट वाढली आहे. याचा फटकाही फुलांना बसला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमी करण्याचा विचार वन विभागाने सुरू केला आहे. त्यादृष्टीने तिकीट दर वाढवणे, बामणोलीकडे जाणार्‍या नागरिकांना घाट मार्गे पाठवणे, अशा उपायांवर चर्चा सुरू आहे.

चराई वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे

पठार परिसरात जनावरांचा वावर न झाल्याने फुलांची वाढ खुंटली. जाळी बंदिस्त असल्याने पठारावर पूर्वीप्रमाणे जनावरे जात नाहीत. जनावरे न गेल्याने फुलांचा प्रसार कमी होऊ लागला, गवताचे प्रमाण वाढू लागले. त्यासाठी या परिसरात चराई वाढवण्यासाठी स्थानिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यासाठी स्थानिकांना काही लाभ देण्यासाठी विचार सुरू आहे. तसेच जनावरांची संख्या वाढवण्यासाठी स्थानिकांशी चर्चा केली जात आहे.

कुंपणाची जाळी काढण्यास सुरुवात

कास पठार हे 1,675 हेक्टर परिसरात पसरले आहे. या पठाराला 2010 मध्ये सात कि.मी.चे कुंपण घातले. यासाठी कोट्यवधींचा खर्च आला. मात्र, आता हे कुंपणच कासच्या हेरिटेज दर्जाच्या मानगुटीवर बसले होते. हे कुंपण काढण्याबाबत दोन मतप्रवाह होते. यावर आता ठोस निर्णय झालेला आहे. सध्याची कुंपणाची जाळी काढायला सुरुवात झाली आहे.

Back to top button