सातारा : कराड दक्षिणेत काँग्रेस विरुद्ध भाजप सामना रंगणार | पुढारी

सातारा : कराड दक्षिणेत काँग्रेस विरुद्ध भाजप सामना रंगणार

उंडाळे; वैभव पाटील :  १८ डिसेंबर रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत कराड तालुक्यात चांगलीच रणधुमाळी माजली असून कराड दक्षिणेत काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे. कराड तालुक्यात एकूण ४४ गावात निवडणूक होणार असून त्यापैकी २४ गावे कराड दक्षिणमधील आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठी गावे असून भाजपा तालुकाध्यक्ष पै. धनाजी पाटील यांचे आटके, माजी आमदार आनंदराव पाटील यांचे विजयनगर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांचे वडगाव हवेली, कृष्णाचे संचालक धोंडीराम जाधव यांचे दुशेरे, माजी सभापती प्रदीप पाटील यांचे तारूख, कृष्णेचे संचालक श्रीरंग देसाई यांचे आणे, माजी सभापती फरीदा इनामदार यांचे येळगाव ही राजकीय संवेदनशील गावे आहेत. याशिवाय आरेवाडी, कुसूर, गणेशवाडी, गोंदी, जुळेवाडी, मनू, रेठरे खुर्द, वनवासनाची, वानरवाडी, हनुमानवाडी, हवेली वाडी, अडोशी, कासार शिरंबे, डेळेवाडी, मस्करवाडी, येळगाव, वडगाव ह., सुपने, प. सुपने या दक्षिणेतील गावांचा समावेश आहे. निवडणुकीची रणधुमाळी •सुरू झाली असून अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर इच्छुकांमध्ये संख्या वाढली आहे.

सरपंच पद थेट जनतेतून असल्याने सरपंच पदासाठीही अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आरक्षणाचा जिथे प्रश्न आहे तेथे स्वतः राजकीय गटाचे नेते कागदपत्राची पूर्तता करून संपूर्ण आर्थिक रसद पुरवत आपल्या गटाचा उमेदवार कसा विजयी होईल याकडे लक्ष देत आहेत.

कराड दक्षिणेत राजकीय परिस्थिती पाहता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर गट सध्या एकदिलाने अनेक ठिकाणी कार्यरत असून काही ग्रामपंचायतीत उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण गटात अंतर निर्माण झाले आहे. दोन्ही गट आपल्या ताकतीने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उतरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माजी मंत्री स्व. विलासराव पाटील’ उंडाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाच्या विरोधात भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांचा गट स्थानिक निवडणुकीसाठी चांगला सक्रिय झाला असून या दोन्ही गटात निकराचा लढा होण्याची शक्यता दिसत आहे. तालुक्यात लक्षवेधी लढतीमध्ये कराड दक्षिणचे भाजप अध्यक्ष धनाजी पाटील यांचे अटके गाव ठरले असून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत.

धनाजी पाटील हे एका बाजूला असून त्यांचेच काही जवळचे भाजप कार्यकर्ते त्यांच्यापासून बाजूला जाऊन महाआघाडी करून शह देण्याच्या प्रयत्नात आहेत. तीच परिस्थिती इतर गावात असून भाजपाने स्थानिक पातळीवर बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने
चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी त्या त्या विभागातील कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्यातील २४ गावांपैकी लहान मोठ्या गावातील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता असून आरेवाडी गणेश वाडी, हवेलीवाडी, मस्करवाडी या सह छोट्या गावांमधून बिनविरोधचा सूर ऐकायला मिळतो तरीही अर्ज भरण्याच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यामध्ये काहीही गोष्टी घडू शकतात. सध्या येळगाव येथे माजी सभापती सौ. फरिदा इनामदार यांचे पती विद्यमान सरपंच मन्सूर इनामदार व विरोधात डॉ. अतुल भोसले गट उभा टाकला आहे. येथेही बिनविरोधचा सूर ऐकायला मिळत आहे.

Back to top button