सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी पहिल्या दिवशी ५४ अर्ज | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी पहिल्या दिवशी ५४ अर्ज

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्या दिवशी जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक ३१९ सरपंचपदासाठी २२ तर सदस्यपदासाठी ३२ असे एकूण ५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. मात्र वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावली व खटाव तालुक्यातून एकही उमेदवारी अर्ज सादर झाला नाही.

जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक  निवडणुकीचा मोठा टप्पा सुरु झाला आहे. या निवडणुकांना स्थानिक पातळीवर महत्व असले तरी तालुका व जिल्हापातळीवरील राजकीय मंडळींनी लक्ष घालायला सुरुवात केली आहे. आगामी काळात जिल्हा परिषद तसेच  पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर दीड वर्षांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. त्यामुळे सध्या निवडणूक जाहीर झालेल्या त्या-त्या तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या असाव्यात राजकीय मंडळी मोट बांधू लागली आहेत. संबंधित गावांमध्ये ‘रसद’ सुरु झाली आहे. काही मोठ्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. सत्ताधाऱ्यांकडून सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडून सत्ता खेचून आणण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. या सत्तासंघर्षात तालुक्याचे राजकीय वातावरण तापले आहे. या राजकीय गरमागरमीत कार्यकर्त्यांची धावपळ सुरु आहे.

उमेदवारांचा शोध घेवून त्यांची कागदपत्रे काढण्यासाठी गावकारभाऱ्यांची दमछाक होत आहे. अशा परिस्थितीत दि. २८ रोजीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र वाई, खंडाळा, महाबळेश्वर, जावली व खटाव तालुक्यातून सरपंच व सदस्यपदासाठी
एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र ५ तालुक्यांतून सरपंच व सदस्यपदासाठी ५४ उमेदवारी अर्ज सादर झाले. त्यामध्ये सातारा तालुक्यातून सरपंच व सदस्यपदासाठी प्रत्येकी २, कराड तालुक्यातून सरपंचपदासाठी ९ तर सदस्यपदासाठी २०, पाटण तालुक्यातून सरपंचपदासाठी १ तर सदस्यपदासाठी ४, कोरेगाव तालुक्यातून सरपंच व सदस्यपदासाठी प्रत्येकी ३, माण तालुक्यातून सरपंच पदासाठी ४ तर सदस्यपदासाठी ३, फलटण तालुक्यात केवळ सरपंचपदासाठी ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुकांना २ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

Back to top button