सातारा : वाई तालुक्यात ‘फिरते म्युझियम’चा उपक्रम; मेणवलीत चार दिवस प्रदर्शन | पुढारी

सातारा : वाई तालुक्यात 'फिरते म्युझियम'चा उपक्रम; मेणवलीत चार दिवस प्रदर्शन

वाई; पुढारी वृत्तसेवा : वाई तालुक्यामध्ये फिरत्या म्युझियममुळे विद्यार्थी इतिहासात रमले. मेणवली येथे चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनला भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळपास ४ हजार विद्यार्थी व ६५० पर्यटकांनी भेट देऊन फिरत्या म्युझियम उपक्रमाचा लाभ घेतला.

देशाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्वलंत इतिहासाची प्रभावी माध्यमाच्या आधारे माहिती मिळावी, यासाठी छ. शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय मुंबईद्वारे हा उपक्रम मोफत उपलब्ध केला होता. यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ मेणवली व नाना फडणवीस वाडा यांचे विशेष सहकार्य मिळाले. मेणवली गावातील युवकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन चोख व्यवस्थापन ठेवले. सरपंच लक्ष्मी वेदपाठक व उपसरपंच संजय चौधरी यांच्या हस्ते म्युझियममधील सहकारी व मेणवलीमधील स्वयंसेवक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळेस बोलताना नाना फडणवीस वाड्याच्या वतीने अविनाश मेणवलीकर यांनी मेणवलीवाडा येथे एक संग्रहालय लवकरच कार्यान्वित होईल, असे जाहीर केले.

गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी सांगितले की, म्युझियम ऑन व्हिल्स या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई या वस्तू संग्रहालयाची प्रतिकृती पाहावयास मिळाली. वाई तालुक्यातील सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला. यातून विद्यार्थ्यांना इतिहासाच्या विविध साधनांविषयी अधिक माहिती मिळाली.

Back to top button