सातारा : स्वच्छ विद्यालयांमध्ये दोन शाळांंचा देशात डंका; केंद्र सरकारकडून गौरव | पुढारी

सातारा : स्वच्छ विद्यालयांमध्ये दोन शाळांंचा देशात डंका; केंद्र सरकारकडून गौरव

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने जावळी तालुक्यातील ओझरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटण तालुक्यातील पाटण व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल या विद्यालयांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार व डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांतर्गत विद्यालयांचे सहा मानकांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये पाणी, शौचालय, हात धुण्यास साबण, संचालन, देखभाल, व्यवहार परिवर्तन व क्षमता निर्माण आणि कोविड काळातील तयारी व प्रतिक्रिया या आधारावर विद्यालयांचे मूल्यांकन झाले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे वर्ष 2016-17 पासून स्वच्छता विद्यालय पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली. 2021-22 च्या स्वच्छ विद्यालय पुरस्कारांसाठी देशभरातील एकूण 39 शाळांची निवड झाली. यामध्ये सर्वसमावेशक श्रेणीमध्ये 34 विद्यालयांची निवड, तर उपश्रेणींमध्ये 5 विद्यालयांची निवड करण्यात आली. याअंतर्गत 17 प्राथमिक आणि 22 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचा समावेश आहे. निवड झालेल्या विद्यालयांमध्ये 21 शाळा ग्रामीण भागातील, तर 18 शाळा या शहरी भागातील आहेत. या विद्यालयांमध्ये 28 शाळा अनुदानित, 11 शाळा खासगी, 2 कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, 1 नवोदय विद्यालय आणि 3 केंद्रीय विद्यालयांचा समावेश आहे. सर्वसमावेशक श्रेणीमधील 34 विद्यालयांना 60 हजार रूपये रोख तर उपश्रेणीतील 5 विद्यालयांना 20 हजार रूपये रोख तसेच प्रशस्ती पत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Back to top button