

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा या 127 किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. या मार्गावर 11 ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन कंपन्यांना बीओटी तत्त्वावर हे सहापदरीकरणाचे काम देण्यात आले आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामाला मुहूर्त लागत नव्हता. मात्र, या महिन्याच्या अखेरीला प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सातारा ते कागल या 127 कि.मी. अंतराच्या महामार्ग सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. कराड तालुक्यातील 7 गावे वगळता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
– वसंत पंधरकर, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण