सातारा-कागल सहापदरीला मुहूर्त; नोव्हेंबर 2025 पर्यंत कामाची मुदत | पुढारी

सातारा-कागल सहापदरीला मुहूर्त; नोव्हेंबर 2025 पर्यंत कामाची मुदत

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल ते सातारा या 127 किलोमीटर मार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. या मार्गावर 11 ठिकाणी उड्डाणपूल उभारले जाणार आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, दोन कंपन्यांना बीओटी तत्त्वावर हे सहापदरीकरणाचे काम देण्यात आले आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करावयाचे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या कामाला मुहूर्त लागत नव्हता. मात्र, या महिन्याच्या अखेरीला प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

  इथे होणार उड्डाणपूल

  • सहापदरीकरणाच्या या कामात नागाव फाटा, लक्ष्मी टेकडी, अंबप फाटा, कणेगाव, येलूर फाटा, वाघवाडी, नेर्ले, शेणे-येवलेवाडी, कराड-मलकापूर, मसूर फाटा, नागठाणे या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. सांगली फाटा येथे महामार्गाची उंची वाढवण्यात येणार आहे.
  • राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ कार्यालयातर्फे ठेकेदाराच्या वित्तीय परिस्थितीची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन काम सुरू करण्यात येणार आहे. यात हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याची अट घालण्यात आली असल्याने नोव्हेंबर 2025 अखेरीस हे काम पूर्ण होणार आहे, तर या ठिकाणी लवकरच सेवा रस्त्याचे काम सुरू होणार आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार, सेवा रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार आहेत.

सातारा ते कागल या 127 कि.मी. अंतराच्या महामार्ग सहापदरीकरणाचे काम सुरू होणार आहे. कराड तालुक्यातील 7 गावे वगळता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
– वसंत पंधरकर, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण

 

  • सातारा-कागल या महामार्गाचे सहापदरीचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्याला आता मुहूर्त लागला आहे. या कामासाठी दोन टप्प्यांत निविदा काढण्यात आली असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
  •  कागल ते पेठ नाका या 63 कि.मी. अंतरासाठी 1 हजार 491 कोटी रुपयांची निविदा होती. मात्र, ठेकेदाराने 30 टक्के कमी दराने निविदा भरल्याने 1 हजार 25 कोटी 20 लाख रुपयांची निविदा मंजूर झाली आहे.
  •  सातारा ते पेठ नाका या 67 कि.मी. अंतरासाठी 1 हजार 749 कोटी 86 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. 15 टक्के प्रीमियमने ठेकेदारांची निविदा मंजूर झाली आहे.

 

 

Back to top button