सातारा : शांतिसागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता | पुढारी

सातारा : शांतिसागर ते शिवशंकर व्हाया कराड जनता

प्रीतिसंगमावरून

  • सतीश मोरे

कुणी पण यावं आणि टिकली (ढपली) मारून जावं’ अशी अवस्था कराडची झाली आहे. कराड शहर दिसतंय छोटं, वाटतंय छोटंस; पण या शहराचा आर्थिक आवाका फार मोठा आहे, ही जाणीव आपल्यातल्या खूप कमी
जणांना असेल. मात्र, बाहेरच्या संस्थांना आहे. आर्थिक सुबत्त्याने नटलेल्या कराडला लुटण्यासाठी जणू काही वित्तीय संस्था, बँका-पतसंस्था यांची चढाओढच लागलेली आहे. नुकतंच शहरातील सुमारे 25 कोटी रुपये ठेवी असणार्‍या शिवशंकर पतसंस्थेला टाळा लागला. गेल्या 15 वर्षांत कराड शहरातील नावाजलेल्या दोन बँका, सुमारे 25 हून अधिक पतसंस्था बंद पडल्या आहेत, अनेक खासगी वित्तीय संस्थांनी कराडकरांना गंडा घालून गाशा गुंडाळला
आहे. काही संस्था इतर संस्थामध्ये विलीन करण्यात आल्यात. मात्र, बंद पडलेल्या बँका आणि पतसंस्था मधील ठेवीदारांचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. बँका पतसंस्था स्थापन करून या माध्यमातून स्वत…ची राजकीय दुकानदारी उभी करणे, दोन नंबरचे पैसे एक नंबर करणे, हे पैसे बांधकाम व्यवसायामध्ये लावणे याची जणू
कराडमध्ये स्पर्धाच लागलेली आहे. एकावर एक संस्था डुबल्यामुळे या पुढील काळात कुठल्या बँकेत पैसे ठेवायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

कराडमध्ये पंधरा वर्षांपूर्वी शांतिसागर नावाची एक मोठी पतसंस्था आली होती. मुळात ही पतसंस्था राजकीय हेतूने स्थापन झालेली होती, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतरच्या काळात कडेगांवची दत्त नागरी, डॉ. पतंगराव कदम
पतसंस्था, भुदरगड यासारख्या पर जिल्ह्यातील अनेक संस्था या ठिकाणी आल्या. त्यांनी मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा केल्या. या ठेवी गोळा करताना मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतरच्या काळात पतसंस्थांच्या
माध्यमातून राजकारण या हेतूने कराड तालुक्यातील काही राजकीय मंडळींनी पतसंस्था काढल्या. त्या पण
बुडीत निघाल्या. पार्ले येथील यशवंत संस्था अशाच कारणामुळे रसातळाला गेली आहे. पुढील काळात कराड मधील देव देवतांच्या नावाने काढलेल्या अनेक पतसंस्था बंद पडत गेल्या. घर, लग्न, भविष्य निर्वाह कारणासाठी ठेवलेले पैसे बुडायला लागले तर दाद कुणाला मागायची असा प्रश्न सामान्य ठेवीदारांना पडला. सरकारने पाच लाखांपर्यंत ठेवीला संरक्षण दिले. मात्र, एवढ्याच एका कारणामुळे बँका पतसंस्थांवरचा विश्वास वृद्धिंगत झाला, असे नाही. पाच लाखांपर्यंत ठेवीला संरक्षण देण्याचे आमिष दाखवून अनेक संस्थांनी ठेवी गोळा केल्या, पैसे गोळा केले.

निनावी नावाने बँकेमध्ये पैसे जमा केले; मात्र पुढील काळात या दोन बँकाही बंद पडल्या. आपणास कळले असेल मी कराड जनता सहकारी बँक आणि जिजामाता बँकेविषयी बोलत आहे.

कराड जनता सहकारी बँक रसातळाला जाणार आहे, याची जाणीव बँकेच्या संचालक मंडळांना किंबहुना अध्यक्षांना होती. त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. मात्र संस्थेमध्ये असणार्‍या निनावी ठेवी, बुडीत कारखानदारांना
भरमसाट प्रमाणात देण्यात आलेली न वसूल होणारी कर्जे अशी अनेक कारणे असल्यामुळे जनता बँकेला वाचवायला कोणी पुढे आलं नाही. शेवटी कराड जनता बँक बुडली. या बँकेवर बंधने आल्यानंतर पुढील काळात संचालक मंडळाने कर्ज वसुलीसाठी मनापासून प्रयत्न केला नाही किंवा फक्त प्रयत्न केला आहे, असे दाखवले. वास्तविक कराड जनता बँकेमध्ये काय झाले आहे, याचे सविस्तर विवेचन या बँकेविरोधात तक्रारदार राजेंद्र पाटील यांनी अनेकदा प्रसारमाध्यमासमोर दिलेले होते. मात्र जनता बँकेच्या संचालक मंडळांनी सुधारणा न करता अनेक गोष्टी
दाबण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी ही बँक संपली.

कराड शहरातील किंबहुना तालुक्यातील जनतेचे खरंच आश्चर्य वाटतं, कराड जनता बँक बुडाल्यानंतर या बँकेविरोधात एकही मोठ्ठं आंदोलन झालं नाही किंवा जे झालं ते गाव पातळीचं होतं. बँकेत पैसे बुडून सुद्धा कराडचे लोक शांत कसे बसतात, याचं आश्चर्य वाटतं. यापूर्वी भुदरगड, शांतिसागर, दत्त, यशवंत पतसंस्था, डॉ. पतंगराव
कदम पतसंस्था अशा अनेक संस्थांकडून ठेवीचे पैसे न मिळालेले कर्जदार अशाच प्रकारे शांत बसले होते.

कराड जनता बँकेच्या विरोधात काही प्रमाणात आंदोलन झाली. त्यानंतर या बँकेवर प्रशासक पुढे अवसायक आला.
त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन करून सुमारे 375 कोटी रुपयांच्या ठेवी परत दिल्या. मात्र, पाच लाखांपर्यंतचीच रक्कम परत मिळू शकली. ज्यांनी पाच लाख रुपयेच्या ठेवी ठेवलेल्या आहेत आणि ज्याची दाम- दुप्पट दहा लाख किंवा त्याहून अधिक झालेली आहे, अशा लोकांना सुद्धा पाच लाखच मिळाले. ज्यांनी दहा लाख किंवा पाच लाखांहून
अधिक रक्कम भरलेली आहे, त्यांनाही पाच लाख मिळाले. अशाप्रकारे कराड जनता बँकेमध्ये ठेवीच्या माध्यमातून जे पैसे बुडालेले आहेत, तो आकडा 100 कोटींच्या दरम्यान न क्कीच असेल. या जनता बँकेविरोधात कराड शहरातील कोणाही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनतेला किंबहुना ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला नाही. कराड शहरातील सर्वच लोकप्रतिनिधी कोठून ना कोठून जनता बँकेच्या संचालक मंडळाचे जवळचे नातेवाईक, मित्र किंवा त्यांच्या राजकीय मित्र होते, आहेत. कराड, मलकापूर शहरात आज रोजी पर जिल्ह्यातील, राज्यातील आणि देशातील सुमारे 60 बँकांचे कामकाज चालते. तसेच 50 पतसंस्थांचे काम चालते. या बँकांमध्ये कराड शहरातील, तालुक्यातील लोकांनी गुंतवलेल्या ठेवीची आकडेवारी अधिकृत उपलब्ध नसली तरी हा आकडा सुमारे 5000 कोटींच्या दरम्यान आहे. यावरून आपणास कळले असेल कराड शहरात किती पैसे आहेत.
2002 साली कराडला एचडीएफसी बँकेची एक शाखा उघडली. ही बँक कराड शहरात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मलाही आश्चर्य वाटले होते. या बँकेच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. त्यावेळी बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना आपण एवढ्या छोट्या शहरात बँकेची शाखा का काढली, असे विचारले होते. त्यावर त्या अधिकार्‍याने ‘तुम्हाला कराड शहराविषयी काय माहिती आहे? आणि कराड शहरात किती पैसे बँकेत पडून आहेत? असा उलटा
सवाल केला होता. त्या काळात कराड मधील वेगवेगळ्या बँका पतसंस्थांमध्ये 500 कोटी रुपये पडून होते. एचडीएफसी सारख्या बँकने कराडमध्ये येताना शहराचा, तालुक्याचा अभ्यास केला होता. सहकार चळवळीच्या माध्यमातून तसेच अनेक शैक्षणिक संस्था कराड शहरांमध्ये असल्यामुळे इथे फार मोठी आर्थिक सुबत्ता आहे. कृष्णा-कोयना नदी काठावर असलेल्या समृद्धीमुळे लोकांच्या खिशात अनेक वर्षांपासून पैसा आलेला आहे. कोल्हापूरनंतर आर्थिक राजधानी म्हणून पश्चिम महाराष्ट्रात कराडचे नाव घेतले जाते. म्हणूनच परजिल्ह्यातील संस्थांनी
कराडला अग्रक्रम दिला आहे. मात्र अशा लुटणार्‍या बँका, पतसंस्थांना कराडमध्ये येऊ न देण्यासाठी
यापुढील काळात प्रयत्न करण्याची गरज आहे.

पश्चिम महाराष्ट ्रातील सवार्ंत मोठी असणारी कराड अर्बन बँक नावाची मोठी बँक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. या बँकेवर लोकांचा विश्वास आहे. कारण त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ पूर्ण व्यावसायिक आहे. या उलट कराड जनता बँक आणि जिजामाता बँकेचे अध्यक्ष संचालक मंडळ पक्के राजकारणी होते आणि या राजकारणानेच जनता बँकेची वाट लावली, असे लोक आता उघड उघड बोलतात. ‘जिथे सर्वाधिक व्याजदराची
लालच तिथे सर्वाधिक मोठा धोका’ असे एक छोटेसे समीकरण आर्थिकसंस्थाविषयी बोललं जातं. मात्र, जास्त व्याजदरच्या मोहात पडलेल्या ठेवीदारांना त्याचा फटका बसला आहे. आर्थिक संस्था मजबूत होण्यासाठी त्यामध्ये काम करणारे संचालक मंडळ कोण आहेत, बँकेचा कारभार कसा चालतो, बँकेचे खरे ऑडिट रिपोर्ट कुठे पाहायला मिळतील, याचा अभ्यास करण्याची आज गरज आहे. मात्र सामान्य ठेवीदारांना हे माहीत नसते. कराडातील सुदृढ
पतसंस्था किंवा बँका कोणत्या? बाहेरून आलेल्या कोणत्या आहेत? कोणत्या बँका फसव्या आहेत? कोणत्या पतपेढ्या किंवा मल्टीस्टेट संस्था धोक्यात आहेत? याची माहिती यापुढील काळात कराडकारांना झाली पाहिजे, नव्हे कराडकरांनी ती घेतलीच पाहिजे. असे झाले नाही तर लुटण्यासाठी उत्कृष्ट सिटी कराड हा आर्थिक संस्थांचा फंडा या पुढील काळातही यशस्वी होत राहील आणि कराडकरांचे पैसे बुडत राहतील. शिवशंकर नागरी पतसंस्थेचे उदाहरण घेतले तर या पतसंस्थेत काय घोटाळा झाला आहे, याची गावभर चर्चा आहे. सहकार उपनिबंधक यांच्याकडून फक्त तपास सुरू आहे. पुढील काही महिन्यांत या पतसंस्थेत न क्की काय झाले आहे? हे सत्य बाहेर येईल. परंतु आज रोजी या बँकेत, पतसंस्थेत पैसे ठेवलेल्या ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.

अशाच प्रकारच्या कराडमध्ये अनेक पतसंस्था आहेत की, ज्या पतसंस्थांचे मालक- चालक पतसंस्थेमध्ये ठेवलेले सर्व पैसे स्वत…च्या वैयक्तिक प्रकल्पावर, मोठ्या साईटवर लावून बसलेले आहेत. मध्यंतरी कोव्हिडच्या संकटामुळे
अशा काही पतसंस्थांचे आर्थिक गणित बिघडले होते. काही पतसंस्था डबघाईला आल्या. तर काही बंद पडल्या. मात्र या पतसंस्थांचे गेल्या चार वर्षातील ऑडिट रिपोर्ट पाहिले तर हे रिपोर्ट अतिशय सुंदर आहेत. अनेक पतसंस्थांना ‘अ’
वर्ग मिळालेला आहे. आता हे ऑडिट करणारे खासगी व शासकीय ऑडिटर यांना सुद्धा आरोपी करण्याची गरज आहे. पैसे खाऊन खोटी कागदं रंगवणारे ऑडिटर आणि पैसा चारणारे टोणगे संचालक मंडळ यांना आता यापुढील काळात सहकार खात्याने काळ्या यादीत टाकण्याची गरज आहे. बँका, पतसंस्थांचे ऑडिट करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेण्याची जबाबदारी ऑडिटरची असते. मात्र, हे अधिकारी नक्की काय करतात? कागद पाहताना त्यांच्या चष्म्यावर, डोळ्यावर झापड आलेली असते की काय? असाही प्रश्न पडतो. कराडकरांनो या पुढील काळात बँका, पतसंस्थांमध्ये पैसे ठेवताना सावध राहा, रात्र वैर्‍याची आहे, असे नाही तर दिवस सुद्धा वैर्‍याचाच आहे. नाहीतर
रात्रभर तमाशात नाचून मिळवलेले मंगला बनसोडे यांचे पैसे एका संस्थेने बुडवले तसे तुमचेही कष्टाचे पैसे बुडत राहतील. तुमच्याही मुला-मुलींची लग्नं पैशाअभावी मोडतील. आजारपणासाठी, म्हातारपणासाठी तुम्ही आर्थिक संस्थेत ठेवलेला पैसा तुम्हाला उपयोगी पडणार नाही. तुमचं घराचं स्वप्न स्वप्नच राहील.

Back to top button