सातारा : उंडाळेतील युवकाचे अपहरण; पोलिसांकडून 24 तासांत सुटका | पुढारी

सातारा : उंडाळेतील युवकाचे अपहरण; पोलिसांकडून 24 तासांत सुटका

कराड;  पुढारी वृत्तसेवा :  कराड तालुक्यातील महारुगडेवाडी ते उंडाळे दरम्यान रविवारी (दि. 30) रोजी दुपारी कारमधून आलेल्या टोळक्याने उंडाळे येथील युवकाचे अपहरण केले. तक्रार दाखल होताच कराड तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनद्वारे केवळ 24 तासांच्या आत अपहृत तरुण अमित आनंदराव चव्हाण (रा. उंडाळे, ता. कराड) याची कोल्हापूर येथून सुटका केली. शिवाय त्याचे अपहरण करणार्‍या दहा संशयितांना कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. या संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अटक केलेल्या संशयितांमध्ये मंदार भीमराव पाटील (वय 23, रा. निगवे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) श्रेणिक अशोक पाटील (25) धैर्यशील राजाराम पाटील (29 दोघेही, रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली), साहिल
कादिर शेख (वय 21, रा. कसबाबावडा, जि. कोल्हापूर) अक्षय शेखर बागडे (वय 26, रा. कसबा बावडा, जय भवानी गल्ली, कोल्हापूर), रोहन विजय गायकवाड (वय 23, रा. कसबा बावडा, कोल्हापूर), ओंकार पांडुरंग रावळ (वय 23, रा. निगवे दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर), मयूर प्रशांत गवळी (वय 24, रा. कसबा बावडा, जि. कोल्हापूर), विकास नरसु वेटाळे (वय 24, रा. कसबा बावडा, जि. कोल्हापूर), श्रीधर वसंत पाटील (वय 25, रा. कसबा बावडा, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी अपहरत तरुण अमित चव्हाण याचा भाऊ नितीन आनंदराव चव्हाण यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, उंडाळे येथील अमित चव्हाण हा स्पोर्ट्स साहित्य विक्री करण्याचा व्यवसाय करतो. स्पोर्ट्स साहित्य विक्री व्यवसायामध्ये नुकसान झाल्याने त्याच्याकडे अनेकांचे पैसे थकित आहेत. रविवार दि. 30 रोजी अमित चव्हाण हा महारुगडेवाडी (ता. कराड) येथे क्रिकेटचे सामने असल्याने टीम घेऊन गेला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महारुगडेवाडी येथून प्रज्वल पाटील व अमित चव्हाण हे दोघेजण मोटरसायकल वरून महारुगडेवाडीवरून उंडाळेकडे येत असताना मस्कराच्या लिंबाजवळ पाठीमागून पांढर्‍या रंगाच्या कारमधून आलेल्या लोकांनी अमित चव्हाण यांच्या मोटरसायकलला कार आडवी मारली.

कारमधील काही लोकांनी खाली उतरून अमितला जबरदस्तीने कारमध्ये बसवले. ती कार नांदगावच्या दिशेने गेल्याचे प्रफुल्ल पाटील यांनी अमित चव्हाण याचा भाऊ नितीन चव्हाण यांना सांगितलेयेथील शशी तोडकरने हिच माहिती नितीन चव्हाण यांना फोनवरुन दिली.

अमित याला नितीन चव्हाण यांनी अमित याचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन बंद लागला. म्हणून नितीन चव्हाण यांनी मित्रांच्या मदतीने अमितचा त्याचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. नितीन यांनी ही बाब बहीण सौ. ज्योती यांना सांगितली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सौ. ज्योती यांनी अमितला फोन केला असता त्याने मी बाहेरगावी आलो आहे. तुला उद्या सकाळी फोन करतो, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी सोमवार दि. 31 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सौ. ज्योती यांनी अमितला फोन करून तुम्ही कुठे आहे. घरी कधी येणार, असे विचारले असता मी उद्या येईन, असे म्हणून अमितने फोन ठेवून दिला.

लागलीच फोन ठेवल्याने नितीन चव्हाण यांना शंका आली. त्यांनी तत्काळ कराड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी फोन नंबर लोकेशनवरून कोल्हापूर येथे छापा टाकून अपहरत अमित चव्हाण याची सुटका केली. यावेळी पोलिसांनी कोल्हापूर येथील 8 व सांगली जिल्ह्यातील कामेरी येथील दोघांना अटक केली. संशयितांना कराड येथील न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सौ. दीपज्योती पाटील करत आहेत.

Back to top button