सातारा : बळीराजा शिवारात; मशागती जोमात .. पीक काढणीला वेग | पुढारी

सातारा : बळीराजा शिवारात; मशागती जोमात .. पीक काढणीला वेग

कण्हेर; बाळू मोरे : कण्हेर परिसरात दिवाळीपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने खरिपातील सोयाबीन, भुईमूग व भात यांचे मोठे नुकसान झाले होते. परतीच्या पावसामुळे खरिपातील पिकांच्या उत्पन्नात मोठी घट येत असल्याचे दिसत आहे. असे असले तरी सोयाबीन,भुईमूग व भात काढणीच्या कामांची लगबग शिवारात दिसून येत आहे. दरम्यान, काढलेल्या पिकांच्या शेतात रब्बी हंगामासाठी शेती दुरुस्ती व पेरणीची लगबग सर्वत्र दिसून येत आहे.

शेतदुरुस्त, पेरणी करणे अवघड

सातारा तालुक्यात परतीच्या पावसाने सोयाबीन व भातांना झोडपल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीने हातात तोंडाशी आलेली पिके वाया जाऊन शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसानीतून बळीराजा आता कुठे सावरू लागला आहे. शिवारात जावून तो नव्या जोमाने कामाला लागला आहे. आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र शेतातील कामाची लगबग चालू आहे. अतिवृष्टीतून वाचलेली पिके काढणी व मळणीच्या कामांमध्ये शेतकरी गुंतला आहे. जोरदार पावसाने शेती झोडपल्याने रब्बीसाठी शेतीची दुरुस्ती व पेरणी करणे अवघड झाले आहे.

शेतकरी कुटुंबासह शिवारात

परतीचा पाऊस थांबताच भागात सोयाबीन व भात पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणच्या शेतात शेतकरी सोयाबीनच्या काढणीसह मळणी करताना दिसत आहेत. काढलेली पिके वाळवून व ती वार्‍याला देऊन घरात साठवून ठेवली जात आहे. मळलेले पीक साठवणूक करून दर आला की विक्रीच्या तयारीत आहेत. शेतीच्या कामात कुटुंबासह शेतात शेतकरी राबताना दिसत आहेत.

बळीराजा पुन्हा झालाय सज्ज…

पावसाने काही ठिकाणच्या शेतात अजूनही चिखल आहे.त्यामुळे भात पिके कुजून गेल्याचे दिसत आहेत. शेतीचे होणारे वारंवार नुकसान पाहता येथील शेतकरी राजा मेटाकुटीला आला आहे. अशाही परिस्थितीत खंबीरपणाने पुन्हा काळ्या मातीत सोन्याचे पीक उगवण्यासाठी शेतकरी पुन्हा सज्ज होऊन आपले कंबर कसत आहेत.

पाणी साचल्याने खचरातील भात कापणी अडचणीची

खरीप हंगामातील काही ठिकाणचे काढावयास आलेले भात पीक हे कापणीला सुरुवात झालेली आहे. परतीच्या जोरदार पावसाने धुमाकूळ घातल्याने काही भात खाचरांमध्ये पाणी साठलेले आहे.अशा खचरातील भात कापणी करणे शेतकर्‍यांना अडचणीचे आणि खर्चाचे झाले आहे. एकाचवेळी शेतातील अनेक कामे सुरू झाल्याने मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर तोडगा म्हणून घरातील माणसांकडूनच भातांची कापणी करावी लागत आहे.

प्रोत्साहनपरचा रब्बीसाठी उपयोग

पावसाने उघडीप दिल्याने बळीराजाला थोडाफार आधार मिळाला आहे. सर्व पिकांचे नुकसान होण्याऐवजी थोडेफार तरी पिक हाती लागले आहे. पूर्ण खरीप हंगाम वाया गेला नाही याचा दिलासा घेत रब्बीसाठीही तयारी चालली आहे. त्यातच प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ अनेकांना मिळाला आहे. त्यामुळे हे पैसे रब्बीसाठी उपयोगी पडणार आहे. तर याचमुळे अनेकांची सावकारी जाचातून मुक्तता होणार आहे. अतिवृष्टीतून वाचलेली पिके काढणी व मळणीच्या कामांमध्ये शेतकरी गुंतला आहे. जोरदार पावसाने शेती झोडपल्याने रब्बीसाठी शेतीची दुरुस्ती व पेरणी करणे अवघड झाली असताना आता आर्थिक ताकद

Back to top button