सातारा : खोडशी येथे भरवस्तीत 9 फुटांची मगर ... परिसरात खळबळ  | पुढारी

सातारा : खोडशी येथे भरवस्तीत 9 फुटांची मगर ... परिसरात खळबळ 

कराड; पुढारी वृत्तसेवा :  खोडशी (ता. कराड) गावातील मानवी वस्तीमध्ये असणार्‍या मुख्य चौकात रविवारी रात्री तब्बल 9 फूट लांब मगरीचे ग्रामस्थांना दर्शन झाले. यामुळे वनविभागाकडून दक्ष राहण्याची सचूना करत पाण्यात उतरताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपासून तालुक्यातील टेंभू धरण, आटके ते पाचवड फाटा या परिसरात स्थानिक शेतकर्‍यांसह ग्रामस्थांना मगरीचे दर्शन होत आहे. या घटना ताज्या असतानाच खोडशी गावानजीक असणार्‍या बंधार्‍यातही मगरीचा वावर असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 15 दिवसांपूर्वी खोडशी परिसरात असणार्‍या खडकावर मगर विश्रांती घेत असल्याचे काहींना दिसले होते.

हीच मगर पुन्हा एकदा रविवारी रात्री खोडशीतील कृष्णा डेअरी चौकात हनुमंत भोपते, आबासोा भोपते, दत्तात्रय भोसले, स्वप्निल भोपते यांना दिसली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती. याच कालावधीत वनविभागाला सुद्धा माहिती देण्यात आली होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल होईपर्यंत मगर बंधार्‍याच्या परिसरातील ओढ्यात निघून गेली होती.

खोडशीसह परिसरात खळबळ…

कराड तालुक्यात मागील वर्षभरापासून नदीकाठच्या गावात वारंवार मगरीचे दर्शन होत आहे. त्यामुळेच पोहण्यासाठी जाताना दक्षता घेणे आवश्यक बनले असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Back to top button