सातारा : पहिले अभ्यंगस्नान अन् लक्ष्मीपूजनही : दीपोत्सवाला उधाण | पुढारी

सातारा : पहिले अभ्यंगस्नान अन् लक्ष्मीपूजनही : दीपोत्सवाला उधाण

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दिवाळीची धामधूम आता शिगेला पोहोचली असून वसूबारस, धनत्रयोदशीनंतर आता सोमवारी दिवाळीची पहिली अंघोळ अर्थात अभ्यंगस्नान होत आहे. यंदा पहिल्या आंघोळीलाच लक्ष्मीपूजन आल्यामुळे फटाक्यांचा आवाज आणखी वाढणार आहे. अवघं जनजीवन दीपोत्सवाने न्हावून गेले असून सर्वत्र या सणाचाच माहोल तयार झाला आहे. आजपासून खर्‍या अर्थाने फटाके फुटणार असून आसमंत दणाणून जाणार आहे. दरम्यान, दिवाळीच्या पूर्वसंध्येेला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली.

वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन,बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सहा सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा हा उत्सव आजपासून खर्‍या अर्थाने सुरू होत आहे. वसूबारस व धनत्रयोदशी झाल्यानंतर आज सोमवारी पहिले अभ्यंगस्नान व लक्ष्मीपूजन असल्याने घरोघरी दीपोत्सवाच्या माहोलाला आणखी उधाण येणार आहे. घरोघरी दिवाळी फराळ करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे. अनेकांनी मात्र आघाडी घेतली असून आता बच्चे कंपनीला फटाके फोडण्याचे वेध लागले आहेत. प्रदुषण मुक्तीसाठी अनेक सामाजिक संस्था प्रबोधनपर कार्यक्रम राबवत असले तरी फटाक्यांचा आनंद लुटला जातोच. त्यामुळे आज पहाटेपासूनच धडामधूम सुरू होणार आहे. शहरासह गावागावात दीपोत्सवाचे प्रसन्न वातावरण तयार झाले असून विविध ठिकाणी आकषर्र्क विद्युत रोषणाई केल्यामुळे अवघा आसमंत उजळून निघाला आहे.

‘घरोघरी, दारोदारी, दीपावलीचा आनंदोत्सव, मनामनातून सार्‍यांचा, आज अनोखा हर्षोत्सव, चला पेटवा दीप नवे स्नेहाचे अन उत्साहाचे, मनोमनी, सार्‍यांचे राहो नाते हे मांगल्याचे, शुभ दिपावली’?अशा शुभेच्छा एकमेकांना दिल्या जात आहेत.

पहिल्या अंघोळीची नजाकत औरच…

लक्ष लक्ष दिव्यांनी मने प्रफुल्लित करणारी आणि वातावरण प्रकाशाने उजळून टाकणार्‍या दिवाळीचा माहोल आजपासून आणखी बहरणार आहे. यंदा पावसाने नको-नकोसे केले असले तरी शनिवारपासून त्याने उसंत घेतली असून थंडीचीही चाहूल लागली आहे. थंडीत त्वचा कोरडी पडू नये म्हणून उटणे लावून अंघोळ करावी हे शास्त्र सांगतं. त्यामुळेच दिवाळीत अभ्यंगस्नानाला विशेष महत्व आहे. दिवाळीतील पहिल्या अंघोळीची नजाकत काही औरच असते. सोमवारी ही पहिली अंघोळ असून याच दिवशी लक्ष्मीपूजनही आले आहे. सुगंधी उटणे व वासाच्या साबणाशिवाय दिवाळीतील अभ्यंगस्नान पूर्णच होत नाही. बाजारपेठेत विविध कंपन्यांची सुगंधित उठणी बाजारपेठेत आहेत. त्याचबरोबर सुगंधीत तेल, अत्तर, साबण उत्पादकांनी बाजारपेठ काबीज केली आहे. या उत्पादनांचा सुगंध संपूर्ण बाजारपेठेत दरवळत आहे.

झेंडूच्या फुलांना मागणी

लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असून सातारा शहर व परिसरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात झेंडू फुले विक्रीसाठी आली होती. पिवळी, केशरी रंगाच्या झेंडूला प्रचंड मागणी होती. सकाळी भाजी मंडई परिसरात 40 ते 50 रुपये किलो दर या फुलाला होता. मात्र पोवईनाका, राजवाडा, राजपथ, एसटी स्टँड परिसर, बॉम्बे रेस्टारंट, शाहूपुरी, मोळाचा ओढा व अन्य परिसरात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात फुले विक्रीसाठी आणली दुपारनंतर फुलाचे भाव 100 रुपये किलोपर्यंत गेले होते. त्यामुळे नागरिकही पुजनासाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करताना दिसत होते.

 

Back to top button