सातारा : आंतरजिल्हा बदलीतील 157 शिक्षकांची प्रतिक्षा कायम | पुढारी

सातारा : आंतरजिल्हा बदलीतील 157 शिक्षकांची प्रतिक्षा कायम

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांपासून लटकलेला शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीचा प्रश्न अखेर निकाली काढून ऑगस्ट महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानुसार दि. 13 ऑगस्टला बदल्यांचे आदेशही काढण्यात आले. मात्र परजिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात येणारे 157 शिक्षक दोन महिन्यानंतरही नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत. तसेच बदलीने आलेल्या शिक्षकांनाही अजूनही प्रशासनामार्फत शाळा दिली नसल्याने या शिक्षकांना शाळा कधी मिळणार असा प्रश्न आता पडला आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये 10 हजारहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील बदलीपात्र शिक्षकांना त्यांच्या स्वजिल्ह्यात ऑनलाईन बदली देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने अशा 62 शिक्षकांना कार्यमुक्तही केले आहे. मात्र परजिल्ह्यातून सातारा जिल्हा परिषदेला मिळणार्‍या 192 शिक्षकापैकी आजपर्यंत 34 शिक्षक हजर झाले आहेत. तर 157 शिक्षकांची प्रतीक्षा आजही कायम आहे. शिक्षकांची आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिने उलटले. मात्र 157 शिक्षक अद्यापही जिल्हा परिषदेकडे हजर झाले नाहीत. त्यामुळे हे शिक्षक केव्हा हजर होणार हा प्रश्नही प्रशासनाला पडला आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत संबंधित जिल्हा परिषदेला शिक्षक सोडण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्यावर संबंधित जिल्हा परिषदेने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे स्वजिल्ह्यात येणार्‍या शिक्षकांना चांगलीच धास्ती लागून राहिली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आंतर जिल्हा बदली झालेले सुमारे 62 शिक्षक कार्यमुक्त केले आहेत. संबंधित शिक्षक त्यांना मिळालेल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर होवून रुजू देखील झाले आहेत. जिल्ह्यात 34 शिक्षक हजर झाले असून त्यांना अद्यापही शाळा मिळालेली नाही. हे शिक्षक जिल्हा परिषदेत दररोज येवून हजेरी लावत आहेत. तसेच या शिक्षकांनी तात्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून आम्हाला शाळा द्यावी, अशी विनंती केली. मात्र अद्यापही प्रशासनामार्फत शाळा देण्यात आली नसल्याने शिक्षक शाळेच्या प्रतिक्षेत आहेत.

बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त

जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. तसेच आंतर जिल्हा बदली झालेल्या 62 शिक्षकांनाही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे त्या शाळाही शिक्षकाविना ओस पडल्या आहेत. गेल्या दोन महिन्यापासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असल्याने नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी लक्ष घालून हजर झालेल्या शिक्षकांंना त्वरित शाळा द्याव्यात, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

Back to top button