सातारा : दीपोत्सवासाठी जनजीवन आतुरले | पुढारी

सातारा : दीपोत्सवासाठी जनजीवन आतुरले

सातारा;  पुढारी वृत्तसेवा :  प्रकाशाचा सण असलेला दीपोत्सव तीन दिवसांवर आला असून घरोघरी तयारीला वेग आला आहे. यावर्षी निर्बंधमुक्त सण साजरा होत असल्याने दीपोत्सवाच्या स्वागतासाठी जनजीवन आतुरले असून सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह दुणावला आहे.

खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांना मात्र दररोज सायंकाळी हजेरी लावणार्‍या परतीच्या पावसाचा अडथळा पार करावा लागत आहे. दीपोत्सव म्हणजे प्रकाशाचा सण असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.
त्यातच कोरोना पश्चात तब्बल दोन वर्षांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर निर्बंधमुक्त दिपोत्सव साजरा होणार आहे. हा दिपोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने घरोघरी तयारीला वेग आला आहे. दिपोत्सवाच्या स्वागतासाठी जनजीवन आतुरले आहे.

नागरिकांमध्ये सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीचा उत्साह दुणावला आहे. व्यावसायिकांनी सुरु केलेल्या विविध ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. बहुतांश व्यावसायिकांनी आपल्या दुकांनाना दिवाळीसाठी आकर्षक विद्युत रोषणाई, स्वागत कमानी तसेच फुगे, तोरणं अशी सजावट केल्याने बाजारपेठेतही दिवाळीचा माहोल तयार झाला आहे.

खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. विशेषत: किराणा व कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत. त्यातच खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांना परतीच्या पावसाचा अडथळा पार करावा लागत आहे. अचानक येणार्‍या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. स्वत:सह खरेदीच्या पिशव्या भिजू नये यासाठी कसरत करावी लागत आहे.

Back to top button