सातारा जिल्ह्यात 1 हजार शाळा बंद होणार? | पुढारी

सातारा जिल्ह्यात 1 हजार शाळा बंद होणार?

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  शासनाने 0 ते 20 पटसंख्येच्या शाळांबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे माहिती मागवली होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यात 2 हजार 690 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा असून, सुमारे 0 ते 20 च्या आत पटसंख्या असलेल्या 1 हजार 77 शाळांची माहिती शिक्षण विभागाने राज्य शासनाकडे सादर केली आहे. त्यामुळे या शाळा बंद होणार की सुरू राहणार? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र, त्याच राज्यात 20 च्या आत पटसंख्या असणार्‍या शाळा बंद करण्याची सुरू असलेली तयारी अतिशय दुर्देवी आणि प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात अडथळा निर्माण करणारी तसेच केंद्र सरकारने पारीत केलेल्या शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारी आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटांतील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करुन देण्याची तरतूद आहे. परंतु, 20 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा सरसकट बंद झाल्यास गोरगरीब, वंचित, बहुजन व शेतकर्‍यांची मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जावू शकतील.

सातारा जिल्ह्यात 2 हजार 690 प्राथमिक शाळा असून, त्यातील 1 हजार 77 शाळांची पटसंख्या 0 ते 20 च्या आत आहे. पटसंख्या कमी असणार्‍या बहुतांश शाळा या दुर्गम व वाहतुकीच्या सोयीसुविधा नसणार्‍या ठिकाणी आहेत. अशावेळी शाळा बंद झाल्यास येथे शिकणारे लाखो विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची भीती आहे.

शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या शाळा या विद्यार्थ्यांसाठी 1 किलोमीटर अंतरावर असाव्यात तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 3 किलोमीटर अंतरावर शाळा असाव्यात. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत शिक्षण मिळावे, असे शिक्षण हक्क कायदा सांगतो. त्यामुळे अशा प्रकारच्या शाळा बंद झाल्यास शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होईल, असे तज्ञांचे मत आहे. जिल्ह्यात 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या शासनाच्या धोरणाला विविध शिक्षक संघटना, सामाजिक संघटना व पालकांमधून उठाव होवू लागला आहे.

अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न निकाली…

पीटीए या कायद्यानुसार 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक, 1 ते 60 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक, 61 ते 90 विद्यार्थ्यांमागे 3 शिक्षक, 91 ते 120 विद्यार्थ्यांमागे 4 शिक्षक, 121 ते 150 विद्यार्थ्यांमागे 5 शिक्षक तर 150 पुढील विद्यार्थ्यांमागे 5 शिक्षक व मुख्याध्यापक पद असते. शिक्षकांची संच मान्यता ही 30 सप्टेंबरच्या विद्यार्थी पटानुसार होते. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्यानंतर शिक्षक हा अतिरिक्त ठरत असतो. त्यानुसार त्याची अन्य शाळेवर नियुक्ती केली जाते. एखाद्या शाळेचा पट शून्य झाला की ती शाळा बंद होते. त्या शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची अन्य शाळेवर शिक्षण विभागामार्फत नियुक्ती करण्यात येते. सध्या जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षकांची सुमारे 1 हजारहून अधिक पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांचे ज्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे, त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत असते. त्यामुळे मुळात शिक्षकच कमी असल्याने जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षक होणार नसल्याचे सध्या तरी दिसून येते.

जिल्ह्यात अशा आहेत शाळा?

जिल्ह्यात 0 ते 20 पटसंख्या असलेल्या तालुकानिहाय शाळा जावली 117, कराड 79, कोरेगाव 61, खटाव 83, खंडाळा 18, महाबळेश्वर 87, माण 102, पाटण 327, फलटण 49, सातारा 92, वाई 62 अशा 1 हजार 77 शाळा आहेत.

0 ते 20 पट असलेल्या शाळेत 11 हजार विद्यार्थी

जिल्ह्यात 0 ते 20 पटसंख्या असलेल्या 1 हजार 77 शाळा आहेत. जावली तालुक्यातील शाळांमध्ये 1 हजार 40, कराड 813, कोरेगाव 684, खटाव 856, खंडाळा 346, महाबळेश्वर 723, माण 1 हजार 227, पाटण 3 हजार 24, फलटण 750, सातारा 100, वाई तालुक्यात 828 असे मिळून 11 हजार 191 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Back to top button