काशीळजवळ अपघातात हिंगनोळेचे दोन युवक ठार | पुढारी

काशीळजवळ अपघातात हिंगनोळेचे दोन युवक ठार

वेणेगाव ; पुढारी वृत्तसेवा : पुणे ते बंगळूर महामार्गावर काशीळ (ता.सातारा) गावच्या हद्दीत श्रीराम मंगल कार्यालयासमोर सातारा ते कराड जाणार्‍या लेनवर मोपेड बाईकला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन युवक ठार झाले. ही घटना मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

पंकज मधुकर थोरात (वय 23) व शुभम एकनाथ लोंढे (वय 25) दोघेही रा. हिंगनोळे ता.कराड अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. या घटनेची फिर्याद सचिन चंद्रकांत जाधव रा. कोडोली सातारा यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली.

याबाबत अधिक माहिती अशी, सातार्‍याहून हिंगनोळे गावी येत असताना हा अपघात घडला. काशीळ गावच्या हद्दीत मोपेड बाईक क्रमांक एम एच 11 सीपी 1359 वरुन पंकज व पाठीमागे बसलेला शुभम हे जात होते. दरम्यान अचानक अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. यामध्ये ते जागीच ठार झाले.

या घटनेनंतर सातारच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात वाहनाच्या तपासाबाबत बोरगाव पोलिसांना सूचना केल्या. बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. अपघातात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर करत आहेत. दोन युवक ठार झाल्याने हिंगनोळे गावावर शोककळा पसरली आहे.

Back to top button