सातारा जिल्हा बँके साठी भाजपप्रणीत पॅनेलची चाचपणी | पुढारी

सातारा जिल्हा बँके साठी भाजपप्रणीत पॅनेलची चाचपणी

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा बँके साठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणूक आढावा व तयारीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील हे सातारा दौर्‍यावर येणार आहेत. परंतु, या दौर्‍यात जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले हे आ. पाटील यांची भेट घेणार का? त्यांच्या बैठकांना जाणार का? पूर्ण दौर्‍यात शिवेंद्रराजे काय भूमिका घेणार, यावर भाजपचे जिल्हा बँकेतील राजकारण अवलंबून आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आजच्या दौर्‍यात भाजपप्रणीत पॅनेलची चाचपणी करणार असल्याने त्यांच्या दौर्‍याला महत्त्व आले आहे.

सातारा जिल्हा बँके च्या प्रारूप मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाला असून हरकती नोंदवल्या जात आहेत. पुढील महिन्यात बँकेच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील हे गुरुवारी सातारा दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात ते जिल्ह्यातील विविध पदाधिकार्‍यांशी संवाद साधून जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करणार आहेत. परंतु, यासाठी गुरुवारी दिवसभर बैठकांचे सत्र सुरू राहणार आहे.

सध्या सातारा जिल्हा बँके वर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आ. शिवेंद्रराजे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व चेअरमन आहेत. ते चेअरमन असतानाच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीने आ. शिवेंद्रराजेंच्या भाजप प्रवेशानंतरही त्यांच्या चेअरमनपदाबाबत त्यांना कोणताही धक्का दिला नाही. जिल्हा बँकेवर आपली सत्ता अबाधित राहावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न केला जात आहे. जिल्हा बँकेत सर्वाधिक सोसायट्या व संचालक हे आ. शिवेंद्रराजे गटाचे आहेत.

त्यामुळे आ. शिवेंद्रराजेंची बँकेतील भूमिका निर्णायक आहे. शिवेंद्रराजे ज्या गटाकडे जातील त्या गटाची वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे आमदार असतानाही जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आ. शिवेंद्रराजेंशी जुळवून घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच अनुषंगाने सर्व राजकीय हालचाली होत आहे. बँकेत पॅनेल पडू नये यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. शिवेंद्रराजे हे भाजपचे पावरफुल्ल आमदार असून ते विरोधात गेल्यास काय होवू शकते? याची कल्पना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते आ. शिवेंद्रराजे यांना दुखावण्याच्या मनस्थितीत नाही.

शिवेेंद्रराजेंनी भाजपच्या नेतृत्वाखाली पॅनेल टाकल्यास राष्ट्रवादीला सत्ता जाण्याची भीती सतावत आहे. याचाच फायदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उठवायचा आहे. शिवेंद्रराजेंनी भाजपप्रणित पॅनल बँकेमध्ये आणावे यासाठी त्यांच्यावर दबाव वाढवला जात आहे. चंद्रकांत पाटील यांची सातारा भेट हे त्याचेच कारण मानले जात आहे.

राष्ट्रवादीशी आ. शिवेेंद्रराजे यांची जवळीक असून याची भाजपला जाणीव आहे. भाजपचे पॅनेल बँकेत टाकल्यास काय होवू शकते? याची कल्पना आ. शिवेंद्रराजे यांनी विरोधी पक्षनेते आ. देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचा दौरा होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे या दौर्‍यात जिल्हा बँकच फोकस करण्यात येणार आहे. आ. पाटील हे बँकेबाबत जिल्ह्यातील भाजपचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची मते जाणून घेणार आहेत.

आ. पाटील दुपारी 2 वाजता सातार्‍यात दाखल होणार आहेत. यानंतर सर्किट हाऊसवर पदाधिकार्‍यांशी संवाद साधणार आहे. या बैठकांना शिवेंद्रराजे जाणार का? जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपची स्थिती काय आहे हे ते चंद्रकांतदादांना सांगणार का? पक्ष पातळीवरून शिवेंद्रराजेंना कोणता आदेश होणार? याविषयी उत्सुकता आहे.

Back to top button