सातारा : माणमध्ये गुटखा जोमात; प्रशासन कोमात

सातारा : माणमध्ये गुटखा जोमात; प्रशासन कोमात

वरकुटे-मलवडी;  पुढारी वृत्तसेवा :  राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही माण तालुक्यात गुटख्याची दणक्यात विक्री सुरू आहे. विक्रेत्यांना अभय दिले जात असल्याने गुटखा विक्री जोमात आणि अन्न औषध प्रशासन कोमात गेल्यासारखी परिस्थिती माणदेशात निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी आहे. परंतु माण तालुक्यात राजरोसपणे गुटखा विक्री सुरू आहे. बाहेरून रात्री-अपरात्री येणार्‍या गुटख्याच्या पुड्यांच्या माळा तरटाच्या पोत्यात खचाखच भरलेल्या असतात. दिवस-रात्र गुटख्याची पोती स्थानिक विक्रेते दुचाकी-चारचाकीतून म्हसवड, दहिवडी व गोंदवले शहरातून ग्रामीण भागात घेऊन येतात. हाच साठा म्हसवड, दहिवडी व गोंदवले येथून काही परिसरातील गावोगावच्या विक्रेत्यांकडे मागणीनुसार पोहोच केला जातो.

माण तालुक्याच्या रस्त्यावर तसेच गावोगावी ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या पुड्या दिसून येतात. सार्वजनिक शौचालयासह अनेक ठिकाणचे कोपरे गुटखा खाणार्‍यांच्या पिचकार्‍यांनी रंगलेले आहेत. अन्न व औषध प्रशासनामार्फत गुटखा विक्रेत्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र अन्न प्रशासनाकडून कुठल्याही विक्रेत्यांवर गेल्या काही महिन्यांत व वर्षात कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. तसेच पोलिसांकडूनही गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. बेकायदा गुटख्याची विक्री सुरू असताना अन्न प्रशासन आणि पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रत्येक पानटपरीत गुटखा विक्री…

माण तालुक्यात हजारपेक्षा जास्त पानटपर्‍या आहेत. या टपर्‍यांपैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त टपर्‍यांमध्ये गुटाख्याची सर्रास विक्री होत आहे. अनेक पानटपरीचालक गुटख्याची पाकिटे लपवून ठेवून विक्री करतात, तर काही पानटपरी चालक उघडपणे गुटख्याची विक्री करताना दिसतात. अनेक टपरीचालकांचे चौकांतील पोलिस तसेच गस्तीवरील पोलिसांशी साटेलोटे असल्याने बिनदिक्कतपणे गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

शाळकरी मुलेही व्यसनाधीन…

गेल्या काही वर्षांत गुटख्याच्या व्यसनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढल्याचे डॉक्टर सांगत आहेत. त्यामुळे तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शहरात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. शाळेच्या परिसरात गुटखा विक्रीस बंदी असूनही अनेक टपर्‍या, दुकानांत गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुटख्याचे व्यसन वाढले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news