सातारा : जालना खून प्रकरणातील संशयित सातार्‍यात जेरबंद;  एलसीबीची कारवाई | पुढारी

सातारा : जालना खून प्रकरणातील संशयित सातार्‍यात जेरबंद;  एलसीबीची कारवाई

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जालना जिल्ह्यातील जाफराबादच्या अ‍ॅड. किरण लोखंडे यांच्या खून प्रकरणातील संशयित विकास गणेश म्हस्के याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) सातार्‍यात पकडले. पत्नीनेच दोघांच्या मदतीने वकिलाचा खून केल्याचे समोर आले असून पकडलेला संशयित सातार्‍यात लपून वास्तव्य करत होता.

याबाबत अधिक माहिती अशी, मनीषा लोखंडे हिचा विवाह अ‍ॅड. किरण लोखंडे यांच्यासोबत मे 2022 मध्ये झाला होता. अवघ्या चार महिन्यांतच या दोघांमधील भांडणे विकोपाला गेली होती. यातूनच मनीषाने गणेश आगलावे व विकास म्हस्के (रा. वाल्हा, ता. बदनापूर, जि. जालना) यांच्या मदतीने पतीचा काटा काढायचा ठरवले. त्यानुसार दि.31 ऑगस्ट रोजी मध्यरात्री संशयितांनी अ‍ॅड. किरण लोखंडे यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच नाक व तोंड दाबून ठार मारले. खुनानंतर मृतदेह घरातच ठेवून घराला कुलूप लावून संशयित निघून गेले.

खुनाच्या दुसर्‍या दिवशी दि. 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी संशयितांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी संशयितांनी घरातील सिलिंडरचा पाईप काढून रेग्युुलेटर चालू करून ठेवले आणि काडी लावली. त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात वकिलाचा मृत्यू झाला, असा भासवण्याचा संशयितांचा प्रयत्न होता. मात्र, पंचनामा झाल्यानंतर त्यामध्ये अनेक संशयास्पद बाबी असल्याचे समोर आले. या स्फोटात मृतदेह पूर्ण जळाला नाही व शवविच्छेदनामध्ये अनेक गोष्टींचा उलगडा होत गेला.

पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचे तांत्रिक विश्लेेषण आणि साक्षीदारांकडे विचारपूस केली असता कोडे उलगडत गेले. पत्नी मनिषा लोखंडे आणि तिचा साथीदार गणेश आगलावे यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आल्यानंतर संशयितांची धरपकड पोलिसांनी केली.

यातील एक संशयित विकास म्हस्के पसार झाल्यानंतर तो ठिकठिकाणी राहिला. दि. 9 ऑक्टोबर रोजी संशयित हा सातार्‍यात आल्याची माहिती सातारा एलसीबीला मिळाली. त्यानुसार कारवाई करुन त्याला पकडले व जालना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोनि अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, संतोष तासगावकर, फौजदार अमित पाटील, पोलिस संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रवीण फडतरे, लक्ष्मण जगधने, गणेश कापरे, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Back to top button