सातारा; पुढारी वृत्तसेवा : जबरी चोरी व मारहाण करून गंभीर जखमी करणार्या संशयितांना पकडण्यासाठी गेलेल्या बोरगाव पोलिसांच्या ताफ्यावर कराड तालुक्यातील हरपळवाडीत जमावाने हल्ला केला. या हल्ल्यात अधिकार्यांसह कर्मचारी जखमी झाले. यावेळी पोलिसांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.
बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतीत गावच्या इमर्सन कंपनीजवळ मंगळवारी सायंकाळी चेतन पवार दुचाकीवरून येत असताना काही युवकांनी त्यांना मारहाण केली. यावेळी त्यांच्याकडील रोख रकमेसह 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. यातील संशयित कराड तालुक्यातील हरपळवाडीत असल्याचे समजल्यावर त्यांना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सुनील ढाणे व त्यांच्या पथकातील अंमलदार व दोन गृहरक्षक यांच्या दोन टिम तयार केल्या.
ही पथके हरपळवाडी गावात वेगवेगळया दोन ठिकाणी जावून आरोपींचा शोध घेत होती. यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक सुनिल ढाणे व त्यांच्या पथकातील एक पोलीस अंमलदार व दोन गृहरक्षक यांनी संशयित आरोपी शहाजी खंडेराव काळभोर याच्या घरासमोर जावून दरवाजा वाजवला. शहाजी काळभोर घरात आहेत काय? अशी विचारणा करुन, आम्ही पोलीस आहोत असे सांगितले. त्यावर आतुनच शहाजी काळभोर याने पोलीस आहेत तर तुमचे आयकार्ड दाखवा, असे म्हणत गावातील इतर मित्रांना कॉल करुन 16 ते 17 लोकांना घरासमोर बोलावून घेतले. जमावाने पोलिसांना काहीएक न विचारता पोलीस उपनिरीक्षक सुनिल ढाणे यांना तसेच सोबतचे पोलिस कॉन्स्टेबल उत्तम गायकवाड व दोन्ही गृहरक्षक यांना धक्काबुक्की केली. पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी बोरगांव पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल उत्तम साधू गायकवाड यांनी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी उंब्रज पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
या घटनेतील संशयित शहाजी खंडेराव काळभोर, अमोल बाळासो पवार, योगेश बाळू सपकाळ, उध्दव शिवाजी काळभोर व इतर 10 ते 12 (सर्व रा. हरपळवाडी ता. कराड) यांच्या विरुध्द उंब्रज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करत आहेत. दरम्यान, याप्रकरणी संशयित शहाजी खंडेराव काळभोर, अमोल बाळासो पवार, योगेश बाळु सपकाळ, उध्दव शिवाजी काळभोर यांना अटक करण्यात आली आहे. बोरगाव पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे.