सातारा : रेंजसाठी घ्यावा लागतोय उंच झाडाचा आधार; 5 जीचा उपयोग काय? | पुढारी

सातारा : रेंजसाठी घ्यावा लागतोय उंच झाडाचा आधार; 5 जीचा उपयोग काय?

बामणोली : पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 जी सेवेचा शुभारंभ केला. मात्र, देशातील अनेक खेड्यांमध्ये अद्यापही नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही. कोयना भाग 105 गाव परिसर गेली दोन दिवस आऊट ऑफ कव्हरेज असल्याने अनेकांची अडचण झाली. या संपूर्ण भागात फक्त बीएसएनएल या एकाच कंपनीचे नेटवर्क असल्याने याच नेटवर्कवर या भागातील बहुतांश नागरिक अवलंबून असतात. विशेष म्हणजे हा भाग मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या गावाशेजारील परिसर आहे.

महाबळेश्वर व जावली तालुक्यातील अनेक गावे आजही संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. त्या गावांमध्ये कोणत्याही कंपनीचे नेटवर्क पकडत नाही. महाबळेश्वर तालुक्यात कांदाटी खोरे, खरोशी- रेनोशीचे खोरे याचा प्रामुख्याने यात समावेश होतो. जावली तालुक्यातील शेंबडी, मुनावळे, कारगाव, आंबवडे, कात्रेवाडी, पिसाडी आदी गावांचा यात समावेश होतो. शालेय विद्यार्थ्यांचा बहुतांश अभ्यास हा ऑनलाईन पद्धतीने दिला जातो. मात्र, कोयना भाग 105 गावांत नेटवर्क सुविधा व्यवस्थित नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना नेटवर्कअभावी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना तर नेटवर्कसाठी पायपीट करून नंतर उंच झाडाचा आधार घ्यावा लागत आहे.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या भागातच आजही अशी अनेक गावे आहेत की तेथे 5 जी सोडाच साधी मोबाईलला रेंज पकडत नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच आपल्या मायभूमीकडे लक्ष देऊन या भागातील लोकांचे नेटवर्क अभावी होत असलेले हाल दूर करावेत व हा संपूर्ण भाग कव्हरेज क्षेत्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

बीएसएनएलचे मोबाईल टॉवर लवकर बसवा कोयना भागातील 105 गावांत सद्यस्थितीत तळदेव, तापोळा, उतेश्वर, अंधारी या चारच ठिकाणी बीएसएनएलचे मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहेत. या चार टॉवरमुळे केवळ ठरावीक गावे आणि भागातच रेंज असते. इतर अनेक गावे कायमस्वरूपी कव्हरेज क्षेत्राबाहेर आहेत. अशा ठिकाणी बीएसएनएलचे मंजूर झालेले टॉवर उभारावेत, अशी मागणी होत आहे.

Back to top button