सातारा : भाजपसोबतच निवडणुका लढणार : पालकमंत्री शंभूराज देसाई | पुढारी

सातारा : भाजपसोबतच निवडणुका लढणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात युती शासनाचे सरकार सत्तेवर आले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका एकत्रित लढण्याचे यापूर्वीच सूतोवाच केल्याचे सांगत सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्ही भाजपसोबतच लढणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री पद मिळाल्यानंतर प्रथमच कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी महाबळेश्वर, जावळी, कोयना या परिसरात विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. जिल्ह्यात पर्यटन वाढीस वाव असूनही यापूर्वी म्हणावा तसा विकास झाला नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पर्यटन आराखडा आखला जात आहे. यात वन्यजीव, वनविभाग आणि पर्यटन महामंडळाचा संयुक्तरित्या समावेश असून निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही ना. शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

त्याचबरोबर मराठवाडी, कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनासह अन्य प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांना गती देणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा 80 टक्के भाग डोंगरी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा स्वतंत्ररित्या डोंगरी विकास आराखडा तयार करण्याची सूचना आपण अधिकार्‍यांना केली आहे.

हा आराखडा तयार होताच आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा करून हा आराखडा मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांबाबत आढावा बैठक सोमवार, 3 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेत प्रलंबित योजना मार्गी लावल्या जातील, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुमारे 20 तास काम करत आहेत. आमचे सरकार मागील सरकारप्रमाणे गप्प बसणारे नाही, असे सांगत ना. शंभूराज देसाई यांनी राज्यातील विकासकामे मार्गी लावत राज्याचा नावलौकिक वाढवण्यासाठी युती शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. त्याचबरोबर कृष्णा खोरे महामंडळाची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.

Back to top button