सातारा : गणित नसलेल्यांना अभियांत्रिकीमध्ये ‘नो’ एंट्रीच? … विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम | पुढारी

सातारा : गणित नसलेल्यांना अभियांत्रिकीमध्ये ‘नो’ एंट्रीच? ... विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रम

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निर्णयानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी गणित नसलेल्या विद्यार्थी जेईई व सीईटी परीक्षा देवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, सध्या अभियांत्रिकीचे प्रवेश सुरू झाले असताना बारावीत गणित नसणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालयांना कोणत्याच सूचना नसल्याने ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीमध्ये गणित नसलेल्यांना ‘नो’ एंट्रीच असल्याने शिक्षण संस्थांसह विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वैद्यकीय, अभियांत्रिकी यासह विविध व्यावसायिक शिक्षण घेण्याकडे कल आहे. आयटीक्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकरीचे उद्दिष्ट असलेले बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकीला प्राधान्य देतात. अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारावर केंद्रीय स्तरावर राबवण्यात येते. बारावीला गणित विषय नसलेल्या विद्यार्थ्यांनाही गुणवत्तेनुसार अभियांत्रिकीला प्रवेश दिला जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मात्र तसे होत नसल्याचे संबंधित विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या जेईई मेन्स व एमएचटी सीईटी परीक्षा देता येतील असा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार सीईटी सेलने गणित नसलेल्या विद्यार्थ्यांनी पीसीएमची सीईटी परीक्षा घेण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी या परीक्षांचे निकालही जाहीर झाले असून त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत. सध्या अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरणार आहेत. या विद्यार्थ्यांकडून अभियांत्रिकीच्या प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी महाविद्यालयांची माहिती घेताना गणिताशिवाय प्रवेश मिळणार का याबाबतही चौकशी करत आहेत. मात्र महाविद्यालय प्रशासनाला अद्याप तंत्रशिक्षण परिषदेकडून याबाबत कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी करून घेण्याबाबत अभियांत्रिकी महाविद्यालये अनभिज्ञ असल्याचे समोर येत आहे. यामुळे प्रवेशाबाबत कोणतीच स्पष्ट माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. अभियांत्रिकीमध्ये गणित नसलेल्यांना नो एंट्रीच असल्याने शिक्षण संस्थांसह विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांची द्विधा मनस्थिती…

गणिताशिवायही अभियांत्रिकी प्रवेश मिळणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेसाठी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला आहे. गुणही चांगले मिळाले आहेत. मात्र आता प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला नक्की प्रवेश मिळेल का याची कोणालाच खात्री देता येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची मनस्थिती बी गु्रपच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा की अभियांत्रिकीला अशी झाली आहे. यामुळे हे विद्यार्थी द्विधा मनस्थितीत अडकले आहेत.

अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीयस्तरावर राबवली जात असल्याने त्यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांचा काहीच रोल नाही. नवीन शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी प्रवेश नोंदणीसाठी दि. 4 ऑक्टोबरपर्यंत मुदत असून तोपर्यंत या विषयावर तंत्र शिक्षण परिषदेच्या काही सूचना आल्या तर यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी गणित नसलेल्या सीईटी देणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
– प्राचार्य डॉ. ए. सी. अत्तार, केबीपी इंजिनिअरिंग कॉलेज.

Back to top button