

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सवामधील मुख्य आकर्षण असलेल्या रास दांडिया गरबा नृत्याचे लोण आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही पोहोचले असून, अवघ्या जिल्ह्यात दांडियाची धूम आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात विविध सार्वजनिक दुर्गामाता मंडळांनी आयोजित केलेल्या 'दांडिया'मध्ये तरुणाई डोलायला लागली असून, सर्वत्र 'मारो गरबा घुमतो जाय'चा माहोल आहे.
बिल्डिंग, चाळी, गल्लीत साजर्या होणार्या नवरात्रौत्सवाला आता इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात विविध सार्वजनिक मंडळांबरोबरच सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. बेस्ट कपल, बेस्ट गरबा प्लेअर अशी विविध बक्षिसे ठेवण्यात आली असून 'ढोली तारो ढोल बाजे, पंखिडा… पंखिड…' अशा विविध गाण्यांवर सातारा शहर परिसरासह जिल्ह्यात सर्वत्र दांडिया, गरब्याचाच बोलबाला आहे. चौकाचौकात दांडियाच्या टिपर्या प्रत्येकाला ठेका धरायला लावत आहेत. त्यामुळे नवरात्रौत्सवाची धूम आता शिगेला पोहोचली आहे. दांडियाला आता उधाण आले असल्यामुळे नवरात्रौत्सव मंडळांनीही विविध रंगढंगात दांडिया आणखी व्यापक केला आहे. पूर्वी अत्यंत पारंपरिक पध्दतीने चौकाचौकात खेळल्या जाणार्या दांडियाचे स्वरुप गेल्या काही वर्षांत बदलले आहे. जुन्या पारंपरिक गरब्याच्या गुजराती गाण्यापेक्षा आता डीजेच्या तालावर बेभान होवून थिरकणारे दांडियाप्रेमी गल्लोगल्ली, गावोगावी दिसू लागले आहेत. सार्वजनिक दांडियाबरोबरच आता यात व्यावसायिक स्वरूपही आले असल्याचे चित्र दिसत आहे.
मोठमोठ्या रकमेच्या बक्षिसामुळे दांडिया स्पर्धा अनेकांना आकर्षित करत आहेत. काही मंडळे दांडिया, गरबा यातील नृत्यकला जपताना दिसत आहेत. शहरातील उपनगरामध्ये तरुण तरुणींना आकर्षित करण्यासाठी सध्या सेलिबे्रटिजना सोबत घेऊन दांडिया खेळण्याची पध्दत रुढ झाली आहे. मोठ्या मंडळांमध्ये खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी कंपन्यांची स्पॉन्सरशिप मिळवली असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.
हजारो वॅटचे ध्वनीक्षेपक, डिस्को लाईट, आणि भलीमोठी गर्दी असल्याने तरुणाईबरोबरच अबालवृद्धांनाही नाचायचा मूडही आवरत नसल्याचे चित्र ठिकठिकाणच्या दांडिया महोत्सवात दिसू लागले आहे. बाजारपेठेत दांडियानिमित्त तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे चनिया चोली, सलमान जॅकेटस्, घागरा, विक्रीसाठी आले आहेत. तसेच महाराष्ट्र, केरळ, राजस्थानी, गुजराती, संखेडा, चांदीची, म्युझिकल अशा विविध प्रकारच्या दांडिया, टिपर्या विक्रीसाठी आल्या असून त्यास तरुणाईमधून चांगली मागणी आहे. कोरोना महामारीनंतर तब्बल तीन वर्षांनी रास दांडिया निर्बंधमुक्त वातावरणात होत असल्याने तरुणाईमध्ये उत्साह संचारला आहे.
दांडियाचे लोण सर्वदूर पोहोचले असून, त्यामध्ये तरुणाईबरोबर बालगोपाळही बेहोश होवून डोलू लागले आहेत. दांडियासाठी आधुनिक आणि पारंपरिकतेची सांगड घातली जात आहे. हा बदल अगदी पेहरावापासून दागदागिन्यांच्या प्रकारात दिसत आहे. या दांडियाच्या परंपरेला साजेसा घागरा चोली, कुडता हा हटके ट्रेंड हल्लीच्या तरुणाईमध्ये बघायला मिळत आहे. साधेपणाने साजरा होणारा नवरात्रौत्सव आता झगमगाटात डोळे दिपवेल असाच होवू लागला आहे. सार्वजनिक दांडियात अनेक ठिकाणी बक्षिसाची खैरात होत असल्यामुळे लोकांचा व्यावसायिक गरब्याकडे कल वाढला आहे.