

कराड; पुढारी वृत्तसेवा : तांबवे (ता. कराड) गावची ग्रामदेवता तांबजाई देवी पार्वती देवीचा अवतार असल्याचे मानले जाते. या देवीचे मूळस्थान कोकणात आहे. सात बहिणी असून कोकणात एक, कोल्हापूर जिल्ह्यात दोन व तिसरी तांबवे येथे, चौथी व पाचवी महुद, सहावी देवराष्ट्रे येथे आहे. तांबजाई देवीच्या नावावरून तांबवे नाव पडले आहे.
या मंदिराचा जिर्णोद्वार गेल्या वर्षी करण्यात आला आहे. देवीची प्राण प्रतिष्ठापणा करून मंदिरातच गणेश, राम, लक्ष्मण, सीतामाता व हनुमान मूर्तीचीही स्थापना केली आहे. यापूर्वी हे मंदिर जुन्या पध्दतीचे होते. त्यामधील देवीच्या मूर्तीही दगडी पाषाणांच्या होत्या. गावकर्यांनी एकत्रित येऊन, लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोध्दार केला. या मंदिरासाठी सभामंडपही उभारण्यात आला. प्राणप्रतिष्ठापणा शिवाचार्य निळकंठ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावासह परिसरात ग्राम प्रदिक्षीणेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
देवीची नवरात्रउत्सवात रोज वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येतात. पार्वतीमाता बुध्दीची देवता, दुर्गुणांचा नाश अशा सतत्वाची माता असून नवसाला पावणारी देवी आहे. चैत्र पंचमीला देवीची यात्रा भरते. 25 मार्च 1916 रोजी देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. दरवर्षी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रात धार्मिक कार्यक्रमांसह देवीची विधीवत पूजा, जागरण, गोंधळ, भजन असे कार्यक्रम होतात. नवसाला पावणार्या देवीची इतर दिवशीही सकाळी आणि संध्याकाळी आरती केली जाते.