सातारा : ‘कास’ला 25 हजार पर्यटकांनी दिली भेट | पुढारी

सातारा : ‘कास’ला 25 हजार पर्यटकांनी दिली भेट

बामणोली; पुढारी वृत्तसेवा :  कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम पूर्णक्षमतेने बहरला असून, कास पुष्प पठारावर 25 सप्टेंबरअखेर सुमारे 25 हजार पर्यटकांनी भेट देऊन फुलांचा आनंद लुटला. कासवरील विविध प्रजातींची फुले पाहण्यासाठी देश-विदेशांतून पर्यटक येत आहेत. शनिवार, रविवार सलग जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे ही गर्दी वाढली. या दोन दिवसांत कास पुष्प पठाराला साधारणपणे 10 हजार पर्यटकांनी भेट दिली असून, रविवारअखेर (15 दिवसांत) कास पुष्प पठाराला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्या 25 हजारांवर गेली आहे.

कास पुष्प पठारावरील फुले पाहून पर्यटकांनी शिवकालीन राजमार्गावरील कुमुदिनी तलावालाही भेट दिली. पर्यटकांनी एमटीडीसीअंतर्गत पीएमपीएलच्या इलेक्ट्रिक बसमधून कास पठाराकडे कुच केले. कास पठाराकडे ये-जा करण्यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जात आहे. कास पुष्प पठारावर सध्या तेरडा, गेंद, सीतेची आसवे, आभाळी, नभाळी, कुमुदिनी, डोसेरा, नीलिमा, आबोलिमा, दीपकाडी, मंजिरी, कंदील पुष्प यांसह असंख्य प्रजातींची फुले पाहावयास मिळत आहेत. बहुसंख्य पर्यटकांनी कास पुष्प पठारावरील फुले पाहून कास-बामणोली परिसरातील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटत मनसोक्त बोटिंगचाही आनंद लुटला.

बामणोली, शेंबडी, मुनावळे या बोटिंग पर्यटनस्थळीही पर्यटकांनी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. अनेक पर्यटकांनी भांबवली वजराई धबधबा तसेच मुनावळे धबधबा पाहून पर्यटनाचा आनंद लुटला. कास पठार कार्यकारी समितीकडून पर्यटकांना योग्य ते मार्गदर्शन केले जात आहे.

Back to top button