भाविकांचे शक्तिस्थान सोनजाई देवी | पुढारी

भाविकांचे शक्तिस्थान सोनजाई देवी

सह्याद्रीच्या कड्या कपारीत डोंगरावर सोनजाई देवीचे तर दुसर्‍या डोंगरावर मांढरदेवीचे मंदिर आहे. बावधनच्या उत्तरेला उंच डोंगरावर सोनजाई देवीचे मंदिर आहे. वाई तालुक्यात मांढरदेवची श्री काळूआई, रेनावळे येथील श्री काळेश्वरी, ओझर्डे गावातील श्री पद्मावती, आसले गावातील तुळजा भवानी, भुईंज गावातील श्री महालक्ष्मी तसेच सोनजाई गडावर सोनजाई देवीचा जागर नवरात्रात केला जातो.

सोनजाई देवीचा नवरात्र उत्सव साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. सोनजाई देवी देवस्थान ट्रस्ट व मंगल गिरी महाराजांच्या पुढाकाराने या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सोमवार दि. 26 सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवास सुरुवात होत असून मंगळवार दि. 4 ऑक्टोबर रोजी नवरात्र समाप्ती होणार आहे. या नऊ दिवसांमध्ये दररोज पहाटे चार वाजता काकडा आरती, पाच वाजता पूजा आरती, सकाळी 6 ते 9 पर्यंत सप्तशती पठाण व हवन, सकाळी 10 ते 12.30 पर्यंत श्रीमद्देवीभागवत कथा, दुपारी 12.30 ते 4 पर्यंत भोजन व विश्रांती, दुपारी 4 ते 6 कीर्तन व संध्या आरती, रात्री 9 ते 10 वाजता देवी जागर करण्यात येणार आहे. हा सर्व विधी वेदमूर्ती विश्वनाथ खरे गुरुजी आणि त्यांचे सहकारी करणार आहेत. नवरात्र उत्सव काळात या ठिकाणी घटस्थापनेपासून संपूर्ण 9 दिवस उत्साहपूर्ण वातावरणात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

Back to top button