नवरात्रोत्सव विशेष : भाविकांचे श्रद्धास्थान मांढरदेवची काळूबाईदेवी | पुढारी

नवरात्रोत्सव विशेष : भाविकांचे श्रद्धास्थान मांढरदेवची काळूबाईदेवी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मांढरदेव हे तीर्थक्षेत्र सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वाई व भोरपासून सुमारे 22 ते 24 किलोमीटर अंतरावर आहे. काळूबाईचे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे 4700 फूट उंचीवर आहे. मांढरगडावर आई काळूबाईचा नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. काळूबाई देवीचा महिमा अलौकिक आहे. अंदाजे 350 वषार्ंपूर्वीचे हेमाडपंथी बांधकाम असलेले पूर्वाभिमुखी मंदिर आहे. मंदिराचा अंतर गाभारा, गाभारा व सभामंडप असे तीन भाग आहेत. सभामंडप 18 व्या शतकात बांधण्यात आले.

देवीची महती

या देवीचे मूळ नाव काळूबाई (काळेश्वरी) असून ती काळूआई, मांढरदेवी या नावाने ओळखली जाते. काळेश्वरी याचा अर्थ जी काळाची ईश्वर आहे ती किंवा काळाला नियंत्रित करणारी शक्ती ती काळेश्वरी. शैव व शाक्त पंथियांमध्ये या स्थानाला विशेष महत्त्व आहे. नवसाला पावणारी, कार्य सिद्धिस नेणारी, भक्तांवरील संकटात त्वरेने धावून येणारी अशी काळूबाईची ख्याती आहे.
देवीची आदिशक्ती, आदिमाता, तुळजाभवानी, कलेची शारदा, संपत्तीची लक्ष्मी, दुर्जनांचा संहार करणारी आदिशक्ती आदिमाता मांढरदेवची काळूआई, काळेश्वरी, काळूबाई, मांढरदेवी अशी अनेक रूपे आहेत. ही देवी म्हणजे पार्वतीचे साक्षात कालिमातेचे रूप असे सांगितले जाते.

देव व असुर संग्रामानंतर जे काही राक्षस उरले त्यांना देवीने युद्धामध्ये पराजित केले. पण, महिषासुर व रक्तबीज हे राक्षस मात्र काही केल्या पराजित होत नव्हते. कारण त्यांना अभय होते. त्यांचे निर्दालन करावे म्हणून सर्व देव भगवतीकडे गेले. देवी व तिचे सर्व सैन्य शिवगण, दाक्षायणी, चंडिका युद्धास सज्ज झाले. घनघोर युद्ध झाले. शेवटी महिषासुर शरण आला. त्याला देवीने आपल्या पायाजवळ स्थान दिले. रक्तबीजाला मारण्यासाठी तिने अष्टायुधे धारण केली. अक्राळविक्राळ रूप धारण करुन त्याला ठार मारले. त्यानंतर देवीला शांत करण्यासाठी स्वत: श्री शंकर देवीच्या मार्गात आले. गर्जना करत देवी फिरत असताना तिचा पाय शंकराला लागला आणि तिचे तेजपुंज शरीर काळवंडले म्हणून तिला काळूबाई, कालिका असे म्हणतात. त्यानंतर देवी श्रम परिहारासाठी मांदार पर्वतावर म्हणजेच मांढरदेव डोंगरावर गेल्याची आख्यायिका आहे.

– धनंजय घोडके, वाई

Back to top button