घरात बसू नका, लोकांमध्ये जा : आ. अजितदादा पवार | पुढारी

घरात बसू नका, लोकांमध्ये जा : आ. अजितदादा पवार

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून आता या बालेकिल्ल्यात लक्ष घालण्याची गरज आहे. आमदारांसह सगळ्या पदाधिकार्‍यांनी घरात न बसता जिल्हाभर फिरले पाहिजे, घरात बसून चालणार नाही. दौरे सुरू करा. जे जे मंत्री होते त्यांनी जिल्हा ढवळून काढा. स्वतंत्र लढायचे आहे हे समजून कामाला लागा, अशा शब्दात विरोधी पक्षनेते आ. अजितदादा पवार यांनी पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना सुनावले.

सोळशी, ता. कोरेगाव येथे ज्येष्ठ नेते व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळस्कर यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, बाळासाहेब सोळसस्कर, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

मी 1999 ला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. तेव्हापासून सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात आहे. मी ठरवले असते तर सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कायम राहिलो असतो, असे नमूद करून आ. अजित पवार पुढे म्हणाले, आमचे पवार कुटुंब हे सोळशीजवळच्या नांदवळचे आहे. त्यामुळे सोळशी, नांदवळचा आम्हाला जिव्हाळा आहे. या जिल्ह्यातील सगळ्यानेत्यांना खूप काही दिले आहे.

बाळासाहेब पाटील तुम्हाला आम्ही मंत्री केले. तुम्ही आता जिल्ह्यात फिरले पाहिजे. शशिकांत शिंदे तुमचा पराभव झाला तरी पक्षाने तुम्हाला विधानपरिषदेवर संधी दिली. वास्तविक महाराष्ट्रात कुठेही पराभूत आमदाराला विधानपरिषदेवर संधी दिली गेली नाही. तुम्हाला मात्र दिली. कोरेगावची जागा जायला नको होती. पण फॉर्म भरायलाच एवढी गर्दी दिसली की अतिआत्मविश्वास वाढला. गर्दी बघून हुरळायचं नसतं. तिथं नेमकं तेच झालं. पक्षाला तुम्ही दिले तसे पक्षानेही तुम्हाला दिले, याची सर्वांनी नोंद घ्या.

रामराजे तुम्हालाही पुन्हा विधानपरिषदेवर पक्षाने संधी दिली आहे. सुनील माने तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात. तुम्ही सर्वांनी मिळून आता पक्षासाठी जिल्ह्यात दौरे काढले पाहिजे. पायाला भिंगरी बांधली पाहिजे. घरात बसू नका, लोकांमध्ये जा, अशा शब्दात अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांना सुनावले.

ते पुढे म्हणाले, आता कारखाने सुरू होतील. ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात साखर कारखाने आहेत त्यांनी कारखान्यात जसे लक्ष घालता तसे मतदार संघातही लक्ष घाला. मकरंदआबा, दिपक चव्हाण, शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख तुम्ही तुमचे मतदार संघ आणखी मजबूत केले पाहिजेत, असा सल्लाही अजितदादांनी दिला. जिल्ह्यात राष्ट्रवादी युवकचे व महिला आघाडीचे काम अजिबात दिसत नसल्याचे सांगून अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.

केंद्र व राज्य सरकार भिती दाखवत आहे. संस्थांचा वापर विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी होत आहे. सरकार किती काळ चालेल माहित नाही. दि. 27 रोजी सुप्रिम कोर्टाचा निकाल आहे. जे राज्यात घडले ते देशाला परवडणारे नाही. हे लोकशाहीला घातक आहे. जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा सगळे पडले आहेत. शिवसैनिक नक्की कुणाच्या पाठीशी आहेत हे लवकरच कळेल, असेही अजितदादा म्हणाले. विकासकामांच्या स्थगितीचे राजकारण राज्यात सुरू आहे. सर्व संस्था हातात पाहिजेत, हा हव्यास चुकीचा आहे, असेही त्यांनी भाजपला फटकारले.

राज्यात सरकार स्थापन होवून तीन महिने झाले तरी पालकमंत्री नाही. लंपी आला तरी आढावा बैठक कुठे झालीय. शंभूराज देसाई सातारा जिल्ह्यासाठी आवाज उठवू शकतात का? असे सांगून आ. अजितदादा म्हणाले, मकरंदआबांना जसा निधी दिला तसाच शिवेंद्रबाबांनाही दिला. ते भाजपमधून निवडून आले तरीही निधी वाटपात मात्र आम्ही दुजाभाव केला नाही. आम्ही असले राजकारण करत नाही. कोणी चुका करू नका आणि सहन करायचेही नाही.

उत्तर कोरेगाव येथील एमआयडीसीला आमची बळजबरी नाही. लोकांचा विरोध असेल तर कशाला कोण करतंय. त्याबद्दल तुम्ही भिती बाळगू नका. तुमच्यात एकी पाहिजे. जे जमिनीचे मालक आहेत त्यांचे ऐकले जाईल. लोकांना विश्वासात घेवून पुढे जावू. जेथे लोकांची संमत्ती आहे तेथे एमआयडीसी होईल. विकास हवा असेल तर एमआयडीसी करावी लागते हे ही लक्षात ठेवा. विनाकारण विरोधही नको, असेही आ. अजितदादा म्हणाले.

आ.रामराजे ना. निंबाळकर म्हणाले, जिल्हा एकत्र करावा लागेल. दादा ताकद देतीलच. जिल्ह्याची संस्कृती बिघडली आहे. तीन पिढ्या राजकारण पाहतोय. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यात आम्ही हे काय पाहतोय. आपल्याला काय मिळत नाही म्हणून वेगळा विचार करणे योग्य नाही. सन 1985 सालचे साहेबांचे भाषण आजही डोक्यात आहे. तरूणांना सोबत घेवून एकत्र यावे लागेल. उरमोडीचे पाणी काय जात बघुन दिले का? असा टोला आ. रामराजेंनी लगावला. आता विकास बघुन राजकारण करावे लागणार आहे. राजकीय संस्कृतीची पुनर्बांधणी करावी लागणार असल्याचे रामराजे म्हणाले.

अजितदादांची नंदकुमार मोरे यांच्यासोबत खलबते…

अजितदादा पवार यांनी कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्याशी सुमारे 1 तास खलबते केली. खटाव तालुक्याची सध्याची राजकीय परिस्थिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेवेळी झालेले डावपेच, येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीच्या निवडणुका याचा सविस्तर आढावा नंदकुमार मोरे यांनी अजितदादा यांना दिला. प्रभाकर घार्गे यांनी घेतलेल्या मेळाव्याबाबत या बैठकीत खलबते झाल्याचे समजते. खटाव तालुक्यात राष्ट्रवादी आणखी बळकट करण्यासाठी काय करावे लागेल याच्या टीप्स अजितदादांनी नंदकुमार मोरे यांना दिल्या. तुम्ही कोणतेही काम घेऊन थेट माझ्याकडे येत जा, खटाव तालुक्यात आपली आधीच ताकद आहे ती आणखी वाढवा, अशा सूचना अजितदादांनी मोरे यांना दिल्या. दादा तुम्ही अशीच ताकद द्या, आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून दाखवू, असा विश्वास मोरे यांनी यावेळी अजितदादांना दिला.

Back to top button