सातारा : लेट वीज बिलांमुळे आर्थिक भुर्दंड | पुढारी

सातारा : लेट वीज बिलांमुळे आर्थिक भुर्दंड

तारळे, एकनाथ माळी : तारळे परिसरात वीज वितरण कंपनीकडून पिठाच्या गिरणी मालकांना देण्यात येणार्‍या वीज बील वाटपाचा भोंगळ कारभार सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत.यामुळे अधिकार्‍यांनी ठेकेदारांशी भागीदारी केली की काय, अशी शंका उपस्थित होत आहे.

कोरोनानंतर व्यवसाय रूळावर येत असताना अधिकार्‍यांकडून मात्र पीठगिरणीच्या मालकांची आडवणूक केली जात आहे. तारळेसह परिसराल घरगुती, औद्योगिक, शेती बिले यामध्ये ग्राहकांना वीज कंपनीने कायमच 440 चा करंट दिला आहे. मुदतीनंतर बिल वाटल्यामुळे ग्राहकांना अर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याबाबत तारळे, उंब्रज व करवडी येथील कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही ठेकेदाराच्या चुकांवर पांघरून घालण्याचेच उद्योग सुरू आहेत. वारंवार टिकेची झोड उठवल्यावर दोन वर्षापासून घरगुती ग्राहकांना विज बिले सुरळीत वाटप सुरू झाला आहे. पण थ्री फेज कनेक्शन धारकांना मात्र दलदलीतच ठेवण्यात धन्यता मानली आहे.

तारळे गावात आठ पिठाच्या गिरणी आहेत. तसेच विभागातही जवळजवळ प्रत्येक गावात अशा गिरणी आहेत.पूर्वी दर तीन महिन्यांनी ग्राहकांना लाईटची बिले देण्यात येत होती.त्यावेळी सर्व काही सुरळीत सुरू असताना दोन महिन्यांनी बिले मिळू लागली व नंतर प्रत्येक महिन्याला ग्राहकांच्या हातात बिले पडू लागली.यातून ग्राहकांच्या हिताला दुय्यम स्थान देऊन ठेकेदार पोसण्याचेच काम झाले की काय अशी शंका उपस्थित होत आहे.

पिठाच्या गिरणींसाठी शक्यतो थ्री फेज कनेक्शनची गरज असते.त्या कनेक्शनचा दरही जास्त असतो.पण गेल्या काही महिन्यांपासून गिरणी मालकांना मुदतीनंतर बिले देण्यात येत असून विनाकारण पाचशे ते हजार रूपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. याबाबत त्यांनी रिडिंग घेणार्‍या कर्मचार्‍याकडे विचारणा केली असता, आमचे काम रिडिंग घेण्याचे असून ठेकेदाराला विचारा असे सांगण्यात येत आहे.ठेकेदार अधिकार्‍यांकडे बोट दाखवत आहे. अधिकारी जबाबदारी झटकत आहेत.

वीज बिल थकले तर वीज कंपनीचे कर्मचारी लगेत वीज पुरवठा खंडीत करतात. पण सुरळीत वीज पुरवठा करण्याबाबत मात्र ते उदासिन असतात. वाढील बिलाबाबतही समाधानकारक माहिती दिली जात नाही.

ना. शंभूराज देसाई यांच्याकडे तक्रार करणार..

ठेकेदार व अधिकार्‍यांकडून गिरणी मालकांना वारंवार नाहक मनस्ताप दिला जात आहे. कोरोनानंतर व्यवसाय अजूनही रूळावर आला नसताना मिळणार्‍या आर्थिक भुर्दंडाला ते वैतागले असून तारळे व उंब्रज कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ठेकेदाराच्या मनमानीला चाप न लावता त्याची पाठराखण करणार्‍या अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी ना. शंभूराज देसाई यांच्याकडे करणार असल्याचे गिरणी मालकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button