सातारा हिल हाफ मॅरेथॉन औरंगाबादच्या प्रल्हाद धनवटने जिंकली | पुढारी

सातारा हिल हाफ मॅरेथॉन औरंगाबादच्या प्रल्हाद धनवटने जिंकली

सातारा : पुढारी वृत्तसेवा : गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद झालेली ११ वी सातारा हिल हाफ मॅरेथॉन रविवारी दिमाखात पार पडली. ७ हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत यावर्षी देशभरातील स्पर्धकांनी बक्षिसांची लयलूट केली. विशेष म्हणजे सातारकर धावपटूंचा या स्पर्धेवर दबदबा राहिला.‘हम भी किसीसे कम नही’ अशा जोशात सातारकर धावपट्टू दिसले.

सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी देशातील विविध ठिकाणच्या धावपटूंनी सहभाग घेतला होता. सकाळी ६ वाजता फ्लॅग दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. काही क्षणातच धावपटू पोलीस ग्राऊंडमधून हलगीच्या आणि तुतारीच्या निनादात पोवई नाक्याच्या दिशेने धावत गेले. चुरशीने झालेल्या स्पर्धेमध्ये पुरुष गटात औरंगाबादच्या प्रल्हाद धनवट याने १ तास ९ मिनिटे ११ सेकंदात सुमारे २१ कि. मी.चे अंतर पार करुन प्रथम क्रमांक मिळवला. तो सध्या सैन्य दलात कार्यरत आहे. दुसरा क्रमांक सातारा जिल्हयाचा सुपुत्र मांढरदेव येथील कालिदास हिरवे याने १ तास १२ मिनिटे ४५ सेकंदात हे अंतर पार करत पटकावला. कोल्हापूच्या परशुराम भोई याने १ तास १६ मिनिटे ३५ सेकंद या वेळेत हे अंतर पार करून तिसरा क्रमांक पटकावला.

महिलांच्या २१ कि.मी. गटात सातार्‍याचा डंका वाजला असून माण तालुक्यातील म्हसवड येथील रेश्मा केवटे हिने हे अंतर पार करण्यासाठी १ तास २४ मिनिटे १६ सेकंद एवढा वेळ नोंदवला. तसेच वृषाली उतेकर हिने १ तास ३९ मिनिटे २६ सेकंद एवढा वेळ घेतला. तर नैनीलालच्या मनीषा जोशी हिने १ तास ४४ मिनिटे ४७ सेकंद एवढा वेळ नोंदवला.

विजेत्या स्पर्धकांना सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे व दीपक प्रभावळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मॅरेथॉन असोसिएशनचे डॉ. संदीप काटे, अ‍ॅड. कमलेश पिसाळ, डॉ. प्रताप गोळे, डॉ. चंद्रशेखर घोरपडे, कन्हैय्यालाल राजपुरोहित, विठ्ठल जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button