सातारा : मराठा बांधव आक्रमक; ‘त्या’ पोलिस निरीक्षकांवर कठोर कारवाईची मागणी | पुढारी

सातारा : मराठा बांधव आक्रमक; ‘त्या’ पोलिस निरीक्षकांवर कठोर कारवाईची मागणी

पाटण; पुढारी वृत्तसेवा : पोलीस निरीक्षक बकाले यांनी मराठा समाजाबाबत अवमानकारक विधान केल्याने पाटण तालुक्यातील मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. भर पावसात जोरदार निदर्शने करत पोलिस निरीक्षक बकाले यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पाटणच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. भविष्यात याप्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मराठा समाज बांधवांनी दिला आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यातील गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण बकाले यांनी जातीयवादी, समाजात तेढ निर्माण करणारे व महिलांविषयी तिरस्कार ठेवणारे व मराठा समाजाबद्दल खालच्या थराला जाऊन वादग्रस्त विधान केले आहे. त्याबद्दल पाटण तालुका सकल मराठा समाजाकडून त्यांचा निषेध करत आहोत. त्यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई शासनाने करावी. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा मराठा समाजाकडून प्रखर आंदोलन केले जाईल, याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील मराठा समाजातील युवकांनी पाटण शहरातील झेंडा चौकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत पोलीस निरीक्षक किरण बकाले विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी राहूल देसाई, पवन तिकुडवे, विक्रम पाटील, अक्षय देसाई, दादासाहेब सुर्वे, नितीन पानस्कर यांच्यासह मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चातील सदस्य उपस्थित होते.

त्वरित आरक्षण मिळावे

मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे हा मराठा समाजावरील अन्याय आहे. गोरगरीब मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण नसल्याने मोठी किंमत चुकवावी लागत आहे. आता शिंदे व फडणवीस सरकारने आरक्षणाच्या विषयात लक्ष घालून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची आवश्यकता असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Back to top button