

सातारा; महेंद्र खंदारे : सातारा जिल्ह्यासह राज्यात यंदा मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम 1 ऑक्टोबरला सुरू करण्याचा प्रयत्न साखर आयुक्त आणि कारखानदारांकडून सुरू आहे. मात्र, सध्याची परिस्थिती प्रतिकूल असल्याने गळीत हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सतत पडणारा पाऊस, कारखान्यांची अंतर्गत असलेली कामे, न मिळालेला गाळप परवाना आणि टोळ्या दाखल न झाल्याने गळीत हंगाम 10 ऑक्टोबरनंतरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यातच दसराही लवकर आल्याने सण करूनच टोळ्या दाखल होतील, असा कयास लावला जात आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन जिल्ह्यात झाले. मात्र, किसनवीर, प्रतापगड आणि खंडाळा हे तीन कारखाने बंद राहिल्याने तब्बल 30 ते 35 हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक राहिला. त्यामुळे शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. साखर आयुक्त कार्यालयाकडून ऊस तोडीचे योग्य नियोजन व नियमन न केल्यानेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप शेतकर्यांकडून केला गेला आहे. यंदाच्या हंगामात जवळपास 40 हजार हेक्टरवर अतिरिक्त उसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार प्रत्येक कारखान्याकडून तोडीचे नियोजन सुरू आहे. यंदाच्या हंगामात किसनवीर व खंडाळा हे कारखाने सुरू होणार आहेत. तर, प्रतापगड कारखाना अजिंक्यतारा कारखान्याने चालवायला घेतला आहे. त्यामुळे सातारा, जावली, कोरेगाव, वाई, खंडाळा या तालुक्यांतील उसाचा प्रश्न मिटणार आहे. मात्र, उसाचे उत्पादन अधिक असल्याने लवकर हंगाम सुरू करण्याचा प्रयत्न कारखान्यांकडून केला जात आहे. अनेक सहकारी आणि खासगी कारखान्यांकडून बॉयलर पेटवण्यात आले आहेत. याचबरोबर कारखान्यातील ऑईलिंग आणि ग्रीसिंगची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. कारखान्यांकडून गाळपाचे पूर्ण तयारी होणार असली तरी पावसाने हंगाम सुरू होण्यास उशीर लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यातच अजूनही टोळ्या आलेल्या नाहीत. बहुतांश कारखान्यांना गाळप परवाने मिळाले नसल्याने जिल्ह्यातील गळीत हंगाम हा 10 ऑक्टोबरनंतरच सुरू होईल, अशी जास्त शक्यता आहे.
गणेशोत्सव संपल्यानंतर आता दुर्गोत्सवाचे वेध नागरिकांना लागले आहेत. सर्वत्रच याची तयारी जोमात सुरू आहे. प्रत्येकाला सण-सुद असल्याने मराठवाड्यातून येणार्या टोळ्याही यामुळे थांबल्या आहेत. 5 ऑक्टोबरला दसरा असल्याने वर्षातील मोठा सण साजरा केल्यानंतरच टोळ्या जिल्ह्यात दाखल होतील. त्यातच तिकडेही आणि जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे टोळ्या येण्याची वेळ आणखी पुढे जाण्याचीही भीती आहे.
गतवर्षी गाळप करूनही एफआरपी पूर्ण न केलेले अनेक कारखाने सातारा जिल्ह्यात आहेत. यंदा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कडक भूमिका घेऊन ज्या कारखान्यांकडून एफआरपी पूर्णपणे देण्यात आलेली नाही त्यांचे गाळप परवाने रोखण्यात आले आहेत. यासाठी आयुक्तांकडून डेडलाईन देण्यात आली आहे. एफआरपी देईपर्यंत गाळप परवाने मिळणार नाहीत, त्यामुळे ज्यांची काही रक्कम राहिली आहे ते कारखाने एफआरपी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. त्यामुळे परवानेही लांबल्याने त्याचा हंगामावर परिणाम होणार आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. आणखी काही दिवस हा पाऊस असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसात उसाची तोड करणे अवघड असते. तसेच शेत ओले असल्याने तोडकर्यांना रानात जाता येत नाही, ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर ओढता येत नाही. त्यामुळे यंदाच्या हंगामात पाऊसही आडकाठी आणणार, असे चित्र तर सध्या दिसत आहे.