सातारा : नैराशेतून युवकाने जीवन संपवले; मित्राला केला सॉरी म्हणून मॅसेज | पुढारी

सातारा : नैराशेतून युवकाने जीवन संपवले; मित्राला केला सॉरी म्हणून मॅसेज

कुडाळ; पुढारी वृत्तसेवा :  उंब्रज येथे परीक्षेला जाताना झालेल्या अपघाताने आलेल्या नैराश्यातून एका तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना इंदवली तर्फ कुडाळ, ता. जावली येथे घडली. अविनाश दिलीप गोळे (वय 22, सध्या रा. इंदवली तर्फे कुडाळ, मुळ रा. पिंपळी, ता. जावली) असे त्या तरुणाचे नाव आहे.

अविनाश गोळे आणि त्याचा मित्र डिसेंबर महिन्यात दुचाकीवरून उंब्रजला परीक्षेला जात असताना शेंद्रेजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात अविनाशचा मित्र जागीच ठार झाला होता तर अविनाश हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्या गुडघ्याच्या वाटीचा चुरा झाला होता. त्यामुळे तो नैराश्यात असायचा. अलीकडे त्याच्या प्रकृतीत चांगली सुधारणाही होत होती. त्याच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मंगळवारी रात्री तो घरातून गावाजवळील स्मशानभूमीजवळ गेला. तेथील पुलाला दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गावात समजल्यावर नागरिकांनी तातडीने तेथे धाव घेऊन अविनाशच्या गळ्याभोवतीचा फास सोडला. परंतु, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतची फिर्याद विक्रम भरत घाडगे यांनी मेढा पोलीस ठाण्यात दिली.

मित्राला केला ‘सॉरी’ म्हणून मेसेज

अविनाशने रात्री 1 वा. त्याच्या मित्राला ‘सॉरी’ म्हणून मेसेज पाठवला. परंतु, हा मेसेज त्या मित्राने सकाळी पाहिला. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीही लिहिली होती. त्या चिठ्ठीत त्याने ‘मला अपंगाचे जीवन जगायचे नाही. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी खूप काय केलयं. धन्यवाद, थँक्यू,’ असे लिहिले आहे.

‘त्याने’ कॉटवर झोपल्याचे भासवले

अविनाश हा नेहमी कॉटवर झोपायचा. घरातून निघून जाताना त्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून कॉटवर कापडी लोड ठेवून त्यावर चादर टाकली होती. तेथे मच्छरदाणीही त्याने लावली होती. सकाळी तो लवकर उठला नाही म्हणून घरातील लोक त्याला उठवण्यास गेले असता तो तेथे नव्हता. त्यानंतर त्याला शोधण्यास सुरुवात झाली.

Back to top button