

खटाव; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीपर्यंत सातारा जिल्ह्यात भाजपाच्यावतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. तालुकानिहाय पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या गण आणि गटनिहाय बैठका, जाहीर सभा, भाजप आणि मोदींनी केलेल्या कार्याची माहिती जनतेला देणे तसेच शक्तीकेंद्रे व बुथ सक्षमीकरणाची मोहीम राबवून जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली मिशन सातारा जिल्हा परिषद सुरु करण्यात येत असल्याची माहिती भाजप जिल्हा कार्यकारिणीने दिली.
राज्यात सत्ताबदल झाल्यापासून भाजपने पक्षाचे वर्चस्व नसलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपरिषदा, नगरपालिकांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा जिल्हा भाजपच्यावतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली 17 आणि 18 तारखेला फलटण तालुक्यात गण आणि गटनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पक्षात नव्याने दाखल होणार्यांबरोबर चर्चा करण्यात येणार आहे. बुथ आणि शक्तीकेंद्र प्रमुखांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. पक्षसंघटन बळकट करण्याबरोबर पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यात येणार आहे. 18 तारखेला सायंकाळी गजानन चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी वाई-खंडाळा तालुक्यात भाजपच्यावतीने बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे. 23 आणि 24 रोजी कराड उत्तर तर 26 आणि 27 रोजी कराड दक्षिण मतदारसंघ ढवळून काढण्यात येणार आहे. 29 आणि 30 तारखेला पाटण आणि कोरेगाव तालुक्यात बैठका पार पडणार आहेत.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात भाजपाचे मिशन जिल्हा परिषद जोमाने राबवण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या केंद्र सरकारने केलेल्या विविध विकासकामांची माहिती देणारा रथ जिल्ह्यात फिरणार आहे. त्याबरोबर मोदींच्या कामांची माहिती देणारी व्हिडिओ क्लीप दाखवण्यात येणार आहे. सेवा पंधरवड्यात प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिरे आणि आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. भाजपच्या मिशन सातारा जिल्हा परिषद आणि सेवा पंधरवड्याची सांगता सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील जाहीर सभेने होणार आहे. दरम्यान, मिशन सातारा जिल्हा परिषद राबवताना भाजपने विरोधी आमदारांच्या मतदारसंघावर फोकस केला आहे. भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचे मतदारसंघ सोडून विरोधी आमदारांच्या तालुक्यांमध्ये आ. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष संघटन वाढवण्यावर भर देणार आहे.
सेवा पंधरवड्यादरम्यान विरोधी पक्षातील अनेकजण भाजपात दाखल होणार आहेत. सातारा येथील सांगता सभेतही जिल्ह्यातील अनेक दिग्गज पक्षात येणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होवून जिल्ह्यावर दावा सांगणार्यांना धक्का बसेल, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.