सातारा : नवरात्रौत्सव मंडळांकडून दुर्गोत्सवाचे नियोजन

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धांदल संपली असून सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी
दुर्गोत्सवाची तयारी जोरात सुरू केली आहे. महिलांनाही नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. ठिकठिकाणी दुर्गामातेच्या मूर्ती बनविण्याची लगबग युध्दपातळीवर सुरू असून दुर्गेची विविध रूपे साकारू लागली आहेत.
सोमवार दि. 26 सप्टेेंबरपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. त्यामुळे दुर्गामातेच्या मूर्ती बनविण्याच्या कामास वेग आला आहे. सातारा शहरातील गडकर आळी, बुधवार नाका व अन्य ठिकाणी मूर्तिकारांनी 3 फुटांपासून 14 फुटांपर्यंत मूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. नवरात्रौत्सव 11 दिवसांवर येवून ठेपला असल्याने मूर्तिकाराकडे दुर्गेची विविध रूपे अवतरू लागली आहेत. मूर्ती बनविण्याची लगबग सध्या जोरात सुरू आहे. गणपतीच्या मूर्तीपेक्षा दुर्गामातेच्या मूर्ती बनविताना जास्त वेळ लागतो. सध्या प्रशासनाने पर्यावरणपूरक मूर्ती तयार करण्याच्या सूचना मूर्तिकारांना दिल्या असल्याने मूर्तिकार शाडू मातीच्या मूर्ती करत असल्याने यावर्षी देवीच्या मूर्तींच्या दरात बर्यापैकी वाढ होणार असल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
गणेशोत्सवाप्रमाणे सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत नवरात्रौत्सव साजरा करणार्या मंडळांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नवरात्र उत्सव 11 दिवसांवर येवून ठेपला असल्याने सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी देवीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी देवीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रतापगड येथील भवानीमाता, मांढरदेव येथील काळूबाई, किन्हई येथील साखरगड निवासिनी, औंध येथील यमाई देवी, देऊर येथील मुधाई देवी, अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवी, आसले येथील भवानीमाता, पारची श्रीराम वरदायिनी, कुळकजाई यासह विविध देवींच्या मंदिरात नवरात्राची धामधूम सुरू झाली आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणच्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी नवरात्रौत्सवास कोणते कार्यक्रम करावयाचे याच्या नियोजन बैठका सुरू केल्या आहेत. नवरात्र उत्सवात मुख्य आकर्षण असणारा खेळ रास दांडिया, गरबा यासाठी मंडळांनी तयारी सुरू केली आहे. रास दांडिया, गरबा खेळण्यासाठी सातारा शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेत विविध 20 ते 25 प्रकारच्या दांडिया टिपर्या विक्रीसाठी आल्या आहेत. रास दांडियाचे घागरा, चनिया चोली व अन्य विविध प्रकारचे ड्रेस कापड बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहेत.