सातारा : मरणानंतरही उत्तर मांड प्रकल्पग्रस्तांची वाट बिकटच

सातारा : मरणानंतरही उत्तर मांड प्रकल्पग्रस्तांची वाट बिकटच

चाफळ; राजकुमार साळुंखे :  पाटणसह कराड तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांना वरदान ठरणार्‍या उत्तर मांड धरणासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणार्‍या माजगांव गावठण येथील बाधित धरणग्रस्तांना जिवंतपणी नरकयातना भोगाव्या लागत आहेत. मात्र मरणानंतरही स्मशानभूमीकडे जायला रस्ताच नसल्याने मृत्यू पावलेल्या प्रकल्पग्रस्ताच्या नातेवाईक, स्थानिक ग्रामस्थांची वाट बिकटच बनली आहे. त्यामुळेच उपेक्षितांचे जीवन धरणग्रस्तांना जीवंतपणी नाही, किमान मृत्यूनंतर तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सन 2001 पासून उत्तर मांड धरणात 70 टक्के पाणीसाठा केला जात आहे. मात्र असे असले तरी उत्तर मांड धरणाच्या निर्मितीमुळे ज्या प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्तांना आपले सर्वस्व गमवावे लागले आहे, त्या प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. आजही ते उपेक्षितांचे जीवन जगतच आहेत. जीवंत असताना शासनाच्या दुर्लक्षामुळे अन्याय होत असतानाच आता धरणग्रस्तांवर मृत्यूनंतरही कसा अन्याय होतो ? हेच माजगाव गावठाणात पहावयास मिळत आहे. नाणेगांव व माथणेवाडी येथील काही धरणग्रस्तांचे माजगांव गावठाण येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना भौतिक व अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच प्रकल्पग्रस्तांना जीवंतपणी आपला हक्क व न्याय मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो आहे. मात्र शासनासह प्रशासकीय अधिकार्‍यांना धरणग्रस्तांकडे पाहण्यासाठी वेळच नाही, हे दुर्दैवी आहे. स्मशान भूमीकडे जायला साधा रस्ताही उपलब्ध नाही. त्यामुळे मृत्यूनंतर मृतदेह घेऊन जात असताना तारेवरची नातेवाईकांसह स्थानिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. म्हणूनच या धरणग्रस्तांना कोणीच वाली नसल्यासारखी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.

पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला

या धरणामुळे पाटण व कराड तालुक्यातील चाफळ, माजगांव, खालकरवाडी, चरेगांव, माथणेवाडी, जाधववाडी, शिंगणवाडी, गमेवाडी, उंब्रज, कळंत्रेवाडी, शिवडे या प्रमुख गावांसह या परिसरातील छोट्या – मोठ्या वाड्यावस्त्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. त्याचबरोबर दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्नही मिटला असून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.

धरणग्रस्ताचा मृत्यू झाल्यास किमान 9 मण जळण भर पावसात खांद्यावरून न्यावे लागते. रस्ता बंद करण्यात आला असला तरी स्थानिकांविरोधात कोणीही आवाज उठवू शकत नाही. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना खूपच त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे किमान स्मशानभूमीसाठी तरी रस्ता मिळावा.
– एक प्रकल्पग्रस्त, माजगाव गावठाण.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news